प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 00:11 IST2025-11-07T00:08:45+5:302025-11-07T00:11:36+5:30
Actress Sulakshana Pandit: प्रसिद्ध गायिका आणि बॉलिवूड अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन झालं. त्यांनी आपल्या अभिनयातून स्वतःची ओळख निर्माण करण्याबरोबरच आवाजाने लोकांची मने जिंकली होती.

प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
Sulakshana Pandit News: बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रसिद्ध गायिका सुलक्षणा पंडित यांचं निधन झालं. त्या ६८ वर्षांच्या होत्या. मुंबईतील नानावती रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. सुलक्षणा पंडित या विजेता पंडित आणि संगीत दिग्दर्शक जतिन-ललित यांच्या बहीण होत्या. ललित पंडित यांनी त्यांच्या निधनाबद्दल माहिती दिली.
ललित पंडित यांनी सांगितले की, सुलक्षणा पंडित यांचं कार्डियाक अरेस्टमुळे ६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर ७ नोव्हेंबर रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सुलक्षणा पंडित यांच्या निधनाचे वृत्त कळताच बॉलिवूडवर शोककळा पसरली.
सुलक्षणा पंडित यांनी अभिनयातून आपली ओळख निर्माण केली. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या आवाजानेही रसिकांची मने जिंकली होती. सुलक्षणा पंडित यांचा जन्म १९५४ मध्ये झाला होता. त्या संगीताची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून होत्या.
सुलक्षणा पंडित यांचे काका महान शास्त्रीय संगीत गायक पंडित जसराज हे होते. त्यांना तीन बहिणी आणि तीन भाऊ आहेत.
बालपणातच अभिनयात पदार्पण
सुलक्षणा पंडित यांनी वयाच्या नवव्या वर्षी अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. १९६७ मध्ये त्यांनी पार्श्वगायिका म्हणून काम सुरू केले. १९७५ मध्ये त्यांनी संकल्प सिनेमातील 'तू ही सागर है तू ही किनारा' गाणे गायले. या गाण्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
त्यांनी १९७०-८० च्या दशकात 'उलझन','संकोच','अपनापण' आणि 'हेरा फेरी' या चित्रपटामध्ये काम केलं होतं. अभिनय आणि संगीत या दोन्ही क्षेत्रात त्यांनी स्वतः ठसा उमटवला.
सुलक्षणा पंडित अविवाहित राहिल्या
त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं, तर त्यांनी कधी लग्न केलं नाही. अभिनेते संजीव कुमार यांच्यासोबत त्यांच्या नाते असल्याची चर्चा राहिली. ६ नोव्हेंबर रोजी संजीव कुमार यांची पुण्यतिथी असते. त्याच दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.