ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 16:39 IST2025-05-10T16:39:00+5:302025-05-10T16:39:56+5:30
Osama bin Laden : कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध गायिकेचा चाहता होता आणि त्याच्या घरात तिच्या गाण्याच्या कॅसेट सापडल्या होत्या.

ओसामा बिन लादेनच्या घरात सापडल्या होत्या बॉलिवूडच्या या प्रसिद्ध गायिकेच्या कॅसेट, ती म्हणाली...
सध्या भारत-पाकिस्तानात तणाव निर्माण झाला आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तानने ड्रोनच्या माध्यमातून भारतीय सीमेवर हल्ले केले. पण भारतीय सैन्याने हे हल्ले परतवून लावले. यादरम्यान पाकिस्तानमधील अंडरवर्ल्ड कनेक्शनसंदर्भातील अनेक किस्से ऐकायला मिळत आहेत. असाच एक किस्सा कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन (Osama bin Laden) संदर्भातला चर्चेत आला आहे. तो बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध गायिकेचा चाहता होता आणि त्याच्या घरात तिच्या गाण्याच्या कॅसेट सापडल्या होत्या. ही गायिका कोण असेल, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर ही गायिका म्हणजे अलका याज्ञिक (Alka Yagnik).
अलका याज्ञिक ही बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध गायिकांपैकी एक आहे. तिची गाणी अजूनही लोकांना खूप आवडतात. अलकाचे चाहते केवळ आपल्या देशातच नाही तर शेजारील देश पाकिस्तानमध्येही आहेत आणि तिच्या सर्वात मोठ्या चाहत्यांपैकी एक ओसामा बिन लादेन होता. अलका याज्ञिकने एकामागून एक अनेक हिट गाणी दिली, ज्यात तेजाब (१९८८) मधील एक दो तीन, प्यार तो होना ही था (१९९८) मधील अजनबी मुझको इतना बता आणि जाने तमन्ना (१९९४) मधील तू चांद है पूनम का सारख्या गाण्यांचा समावेश आहे. तिच्या सुरेल आवाजाने तिने जगभरातील लोकांची मने जिंकली आणि ती घराघरात लोकप्रिय झाली.
लादेन अलका याज्ञिकचा होता चाहता
२०११ मध्ये खुलासा झाला की अल-कायदाचा कुख्यात नेता ओसामा बिन लादेन हा तिचा मोठा चाहता होता. पाकिस्तानातील अबोटाबाद येथील बिन लादेनच्या लपण्याच्या ठिकाणावर सीआयएने केलेल्या छाप्यादरम्यान, एजेंटना त्याच्या संगणकावर बॉलिवूड गाण्यांच्या कॅसेटचा संग्रह सापडला होता. त्यामध्ये अलका याज्ञिकचे अनेक ट्रॅक तसेच उदित नारायण आणि कुमार सानू यांसारख्या प्रसिद्ध गायकांच्या गाण्यांच्या कॅसेट होत्या.
गायिका म्हणाली...
अलका याज्ञिकला जेव्हा ओसामा बिन लादेनच्या संगीतावरील प्रेमाबद्दल सांगण्यात आले तेव्हा ती चकित झाली. एका मुलाखतीत तिला हे सांगण्यात आले तेव्हा ती म्हणाली की, "ही माझी चूक आहे का? ओसामा बिन लादेन, तो कोणीही असो, त्याच्या आत एक छोटासा कलाकार नक्कीच होता. जर त्याला माझी गाणी आवडत असतील तर ती चांगली गोष्ट आहे."