'हेरा फेरी ३' सिनेमा रखडला, मुख्य कारण आता आलं समोर; दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 17:07 IST2026-02-26T17:07:00+5:302026-02-26T17:07:52+5:30
'हेरा फेरी ३'सध्या ज्या कायदेशीर कचाट्यात सापडला आहे, कारण...

'हेरा फेरी ३' सिनेमा रखडला, मुख्य कारण आता आलं समोर; दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी सोडलं मौन
अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या तिकडीचा 'हेरा फेरी' सिनेमा ऑल टाईम हिट आहे. याच सिनेमाच्या तिसऱ्या भागाची गेल्या काही महिन्यांपासून चर्चा आहे. आधी परेश रावल यांनी सिनेमा सोडल्याचं समोर आलं होतं. मात्र नंतर दिग्दर्शकाशी चर्चा झाल्यानंतर त्यांची पुन्हा सिनेमात एन्ट्री झाली. तर आता सिनेमा पुन्हा रखडला आहे. अक्षय कुमार आणि मेकर्समध्ये काही मतभेद झाले म्हणून सिनेमा थांबल्याचं परेश रावल यांनी सांगितलं होतं. दरम्यान यावर दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी मौन सोडलं आहे.
ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शन यांनी स्पष्ट की सध्या सिनेमासंबंधी गोष्टी गुंतागुतीच्या बनल्या आहेत. काही लोक सिनेमाच्या राइट्सवर दावा ठोकत आहेत. तर काही संगीतावर दावा करत आहे. अशात जोपर्यंत हा वाद कायदेशीररित्या दूर होत नाही तोवर सिनेमाचं काम पुढे जाणं शक्य वाटत नाही.
'हेरा फेरी ३'सध्या ज्या कायदेशीर कचाट्यात सापडला आहे त्यातून आता सहज सुटका होणं कठीण आहे. निर्माते जीपी विजयकुमार यांनी मद्रास उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. या फ्रँचायझीचे खरे हक्क माझ्याजवळ आहेत ना की फिरोज नाडियाडवालाकडे असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
कॉन्ट्रॅक्टचं उल्लंघन?
बार अँड बेंचच्या रिपोर्टनुसार, सेलन आर्ट्स इंटरनॅशनल प्रोडक्शन हाऊसने कोर्टात असं स्पष्ट केलं की नाडियाडवाला यांच्याकडे फक्त मल्याळम सिनेमा रामजी राव स्पीकिंगच्याच रिमेकचे अधिकार आहेत. यावरुनच २००० साली 'हेरा फेरी' बनला होता. नाडियाडवाला यांनी कॉन्ट्रॅक्टचं उल्लंघन करुन न केवळ फिर हेरा फेरी बनवला तर फ्रँचायझी राइट्स अक्षय कुमारच्या केप ऑफ गुड फिल्म्स कंपनीला ट्रान्स्फरही केले. त्यामुळे राइट्स नक्की कोणाकडे हा कायदेशीर वाद संपत नाही तोवर सिनेमा थंडबस्त्यात गेला आहे.