'धुरंधर'मधील जमील जमालीचं पात्र खऱ्या पाकिस्तानी नेत्यावर आधारित? राकेश बेदी खुलासा करत म्हणाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 12:58 IST2025-12-16T12:51:30+5:302025-12-16T12:58:02+5:30
राकेश बेदी यांनी मान्य केले की, त्यांचे हे पात्र पाकिस्तानमधील एका वास्तवातील राजकारण्यावर आधारित आहे.

'धुरंधर'मधील जमील जमालीचं पात्र खऱ्या पाकिस्तानी नेत्यावर आधारित? राकेश बेदी खुलासा करत म्हणाले
विनोदी आणि गंभीर भूमिकांनी बॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी सध्या 'धुरंधर' चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आहेत. आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर या चित्रपटात रणवीर सिंह, संजय दत्त व अक्षय खन्ना यांच्यासह अभिनेते राकेश बेदी यांनी जमील जमाली या पाकिस्तानी राजकारण्याची भूमिका साकारून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. याचदरम्यान, दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने या पात्रासाठी कशी तयारी केली, याबद्दल खुलासा केला. राकेश बेदी यांनी मान्य केले की, त्यांचे हे पात्र पाकिस्तानमधील एका वास्तवातील राजकारण्यावर आधारित आहे. मात्र त्यांनी नाव उघड केले नाही.
दैनिक भास्करशी बोलताना जमील जमाली या भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीवर भाष्य केलं. ही भूमिका पूर्णपणे प्रेरित होती का, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, "हे पूर्णपणे प्रेरित असावे असे काही नाही. मी काही पाकिस्तानी नेत्यांना पाहिले, त्यांची बोलण्याची शैली आणि हावभाव नोंदवले. मग त्यातून जे योग्य वाटले, ते निवडले".
या भूमिकेसाठीचा 'आवाज' पकडताना त्यांनी खूप मेहनत घेतली. ते म्हणाले, "एका नेत्याचा आवाजही मी उतरवला आणि त्यांचे भाषण वारंवार ऐकून सराव केला. कारमध्ये जातानाही मी त्यांची लांबलचक भाषणे ऐकत राहिलो, जेणेकरून माझ्या आवाजात तोच परिणाम येईल". बेदींच्या या सरावाचा परिणाम इतका जबरदस्त होता की, त्यांच्या पत्नीलाही त्यांचा आवाज ओळखता आला नाही.
दिग्दर्शक आदित्य धर यांचे मार्गदर्शनही या भूमिकेसाठी महत्त्वाचं ठरल्याचं त्यांनी सांगितलं. बेदी म्हणाले की, आदित्यजींनी सल्ला दिला की आवाज जास्त बदलू नये, ज्यामुळे लक्ष आणि दृश्याचे महत्त्व कायम राहील. त्यांनी दिग्दर्शकाचा हा सल्ला मान्य केला आणि अभिनयातील बारकावे कायम राखले".