धुरंधरचा दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी बॉलिवूड पार्ट्यांपासून राहते दूर, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 12:59 IST2025-12-22T12:56:36+5:302025-12-22T12:59:24+5:30
मद्यपानाला दिला नकार अन् मागितला चहा! अभिनेत्रीला बॉलिवूड पार्ट्यांनी केलं 'बॅन'

धुरंधरचा दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी बॉलिवूड पार्ट्यांपासून राहते दूर, म्हणाली...
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' सिनेमाची जगभरात चर्चा आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा, चाहत्यांचा आणि इंडस्ट्रीतील कलाकारांचाही जोरदार प्रतिसाद मिळत आहे. दुसरीकडे आदित्य धरची पत्नी आणि अभिनेत्री यामी गोतम हिचादेखील 'हक' हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. या चित्रपटाचंही समिक्षकांनी भरभरुन कौतुक केलं. आदित्य धर आणि यामी हे दोघेही सध्या ट्रेंड करत आहेत. अशातच यामीचा एक जुना किस्सा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीनं बॉलिवूड पार्ट्यांपासून दूर राहण्याचं कारण सांगितलं होतं.
बॉलिवूडच्या हाय-प्रोफाईल पार्ट्यांमध्ये यामी आणि आदित्य क्वचितच दिसतात. यामीने 'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत एका पार्टीतील प्रसंग सांगितला होता. यामीला मद्यपान करायला आवडत नाही. एका पार्टीत जेव्हा तिला ड्रिंक ऑफर करण्यात आली, तेव्हा तिने नम्रपणे नकार दिला. यावर तिथल्या होस्टने आश्चर्य व्यक्त केलं. पुन्हा कोणीतरी ड्रिंकसाठी आग्रह करेल या भीतीने यामीने चक्क चहा मागवला. मात्र, बॉलिवूडच्या झगमगत्या पार्टीत चहा मागवताच तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तिच्याकडे अत्यंत 'विचित्र' नजरेने पाहिले. या प्रसंगानंतर यामीला ना कधी कोणत्या पार्टीचं आमंत्रण आलं, ना ती स्वतः कधी गेली.
यामी म्हणाली की, १० वर्षांपूर्वी जेव्हा ती इंडस्ट्रीत आली होती, तेव्हा लोकांना भेटणे आणि त्यांच्यात मिसळणे ही तिची गरज होती. पण, आता तिच्या प्राधान्यक्रमात बदल झाला असून तिला केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करायला आवडते.
आजच्या काळात जिथे सेलिब्रिटी आपल्या खाजगी आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करतात, तिथे आदित्य आणि यामी मात्र आपलं खाजगी आयुष्य अत्यंत गुप्त ठेवण्यासाठी ओळखले जातात. आदित्य धर आणि यामी गौतम यांच्या बाबतीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे त्यांचं माध्यमांसमोर येणं. जेव्हा त्यांचा एखादा चित्रपट प्रदर्शित होणार असतो, केवळ तेव्हाच हे दोघे प्रमोशनसाठी कॅमेऱ्यासमोर दिसतात. एकदा का चित्रपटाचं काम संपलं की, हे जोडपं पुन्हा आपल्या शांत आणि खाजगी जगात परततात.