झी गौरव पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेले धर्मेंद्र; महाराष्ट्राबद्दल व्यक्त केलं होतं प्रेम, म्हणालेले-
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 13:58 IST2025-11-25T13:57:38+5:302025-11-25T13:58:31+5:30
धर्मेंद्र यांनी झी गौरव पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्राबद्दल त्यांचं प्रेम व्यक्त केलं होतं. त्यावेळी त्यांनी मराठी कलाकारांचंही कौतुक केलं होतं. बातमीवर क्लिक करुन बघा व्हिडीओ

झी गौरव पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेले धर्मेंद्र; महाराष्ट्राबद्दल व्यक्त केलं होतं प्रेम, म्हणालेले-
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं काल (२४ नोव्हेंबर) निधन झालं. धर्मेंद्र यांच्या निधनामुळे त्यांचे चाहते आणि बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. धर्मेंद्र यांनी त्यांच्या कारकीर्दीत विविध सिनेमांमध्ये काम केलं. याशिवाय मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांशी त्यांचे चांगले संबंध होते. काही वर्षांपूर्वी झी गौरव पुरस्कार सोहळ्यात धर्मेंद्र सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्राबद्दल आणि मराठी कलाकारांबद्दल त्यांचं प्रेम व्यक्त केलं.
धर्मेंद्र यांनी महाराष्ट्राबद्दल व्यक्त केलेलं प्रेम
धर्मेंद्र यांचा झी गौरव पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात आला होता. त्यावेळी अभिनेत्री शोभा खोटे त्यांच्यासोबत होत्या. धर्मेंद्र त्यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले होते, ''माझ्या महाराष्ट्रीयन मित्रांनो, मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो. माझ्या महाराष्ट्राच्या आईने माझ्यावर खूप प्रेम केलं. मी माझ्या महाराष्ट्र आईचे कायम आभार मानेल. कारण मी आज जो काही आहे, तो या महाराष्ट्र आईच्या योगदानामुळे आहे. कोई मुस्कुरा देता है, मैं हात बढा देता हू, कोई हात बढा देता है, मैं सीने से लगा लेता हू.'' अशाप्रकारे धर्मेंद्र यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्या.
धर्मेंद्र यांनी या मराठी सिनेमात केलंय काम
धर्मेंद्र यांनी त्यांच्या कारकीर्दीत एकमेव मराठी सिनेमात काम केलं होतं, तो सिनेमा म्हणजे 'हिचं काय चुकलं'. मुंबईतील चांदिवली स्टुडिओचे मालक हेमंत कदम यांचे मित्र होते. त्यावेळी मैत्रीसाठी धर्मेंद्र यांनी हेमंत कदम यांच्या 'हिचं काय चुकलं' या सिनेमातील एका गाण्यासाठी शूटिंग केलं होतं. 'घेऊन टांगा सर्जा निघाला, दूर धन्याचा गाव... अरे तू धाव', असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यात त्यांनी विक्रम गोखलेंसोबत अभिनय केला होता.