बॉलिवूड संन्यास घेतल्यानंतर झायरा वसीमने प्रथमच शेअर केला फोटो, पाहा तर किती बदलली...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 18:05 IST2021-10-05T18:04:23+5:302021-10-05T18:05:10+5:30
Zaira Wasim : होय, बॉलिवूडमधून संन्यास घेतल्यानंतरचा तिचा हा पहिला फोटो आहे आणि म्हणूनच या फोटोची चर्चा होतेय.

बॉलिवूड संन्यास घेतल्यानंतर झायरा वसीमने प्रथमच शेअर केला फोटो, पाहा तर किती बदलली...!
दंगल आणि स्काय इज पिंक या सिनेमात झळकलेली अभिनेत्री झायरा वसीमने ( Zaira Wasim ) कधीच बॉलिवूडमधनू संन्यास घेतला. धर्माच्या नावावर बॉलिवूड सोडण्याच्या झायराच्या या अनपेक्षित निर्णयाने अनेकांना धक्का बसला होता. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. सोशल मीडियावरही याची खूप चर्चा झाली होती. आता झायराने एक फोटो शेअर केला आहे. होय, बॉलिवूडमधून संन्यास घेतल्यानंतरचा तिचा हा पहिला फोटो आहे आणि म्हणूनच या फोटोची चर्चा होतेय.
30 जून 2019 साली झायराने बॉलिवूडला रामराम ठोकला होता. तेव्हापासून तिने स्वत:चा एकही फोटो सोशल मीडियावर शेअर केला नव्हता. सिनेमा सोडल्यानंतर सोशल मीडियावरचे स्वत:चे सर्व फोटो तिने डिलीट केले होते. शिवाय आपले सर्व फोटो डिलीट करावे, अशी विनंती चाहत्यांनाही केली होती.
ताज्या फोटोत झायरा वसीम बुर्का घालून एका पुलावर उभी असलेली दिसते. या फोटोत झायराचा चेहरा दिसत नाही. फक्त तिची पाठमोरी आकृती तेवढी दिसतेय. आमिर खानचा सुपरहिट सिनेमा ‘दंगल’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या झायरा वसीमचा ‘द स्काय इज पिंक’ हा अखेरचा चित्रपट ठरला. या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाल्यानंतर झायराने अचानक बॉलिवूडला अलविदा म्हटले होते.
अल्लाह के रास्ते से भटक गई थी..., असे सांगत झायराने आपला हा निर्णय चाहत्यांशी शेअर केला होता. ‘पाच वर्षांपूर्वी मी बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाने माझे आयुष्य बदलले होते. माझा हा प्रवास प्रचंड थकवणारा होता. या पाच वर्षांत मी स्वत:शीच झगडले. पण इतक्या लहान वयात मी इतका मोठा संघर्ष करू शकत नाही. त्यामुळे मी बॉलिवूडशी नाते तोडते आहे. मी अतिशय विचारपूर्र्वक हा निर्णय घेतला आहे...’, असे झायराने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले होते.