जबरदस्त ॲक्टिंग अन् चेहऱ्यावरील करारी भाव; 'धुरंधर'मध्ये रेहमान डकैतच्या मुलाची भूमिका गाजवणारा बिहारचा 'लाल' आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 18:10 IST2025-12-20T18:09:03+5:302025-12-20T18:10:59+5:30
Dhurandhar Movie : 'धुरंधर'मध्ये रेहमानच्या या धाकट्या मुलाची भूमिका नक्की कोणी केली आहे, हे जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक आहे.

जबरदस्त ॲक्टिंग अन् चेहऱ्यावरील करारी भाव; 'धुरंधर'मध्ये रेहमान डकैतच्या मुलाची भूमिका गाजवणारा बिहारचा 'लाल' आहे तरी कोण?
'धुरंधर' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्यातील गाणी, कलाकार आणि कथा या सर्वांचीच जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या कास्टिंगवरही विशेष मेहनत घेण्यात आली आहे. एका मुलाखतीत कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांनी सांगितले होते की, चित्रपटाचे कास्टिंग फायनल करण्यासाठी त्यांना सुमारे दीड वर्षांचा काळ लागला. ५ डिसेंबर रोजी 'धुरंधर' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
चित्रपट प्रदर्शित होऊन आता १५ दिवस पूर्ण झाले आहेत. या दोन आठवड्यांत चित्रपटाने ४०० कोटींहून अधिक कलेक्शन केले आहे. या विकेंडला हा आकडा ५०० कोटींच्या पार जाण्याची दाट शक्यता आहे. चित्रपटात अक्षय खन्नाने रेहमान डकैतची भूमिका साकारली आहे, ज्याची सध्या खूप चर्चा होत आहे. 'FA9la' गाण्यावरील त्याच्या डान्स स्टेप्सने तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
सौम्या टंडनने साकारली पत्नीची भूमिका
'भाभीजी घर पर हैं' मधील 'गोरी मॅम' म्हणजेच सौम्या टंडनने चित्रपटात रेहमान डकैतच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. या सगळ्यात रेहमान डकैतची दोन मुले - फैजल आणि नईम हे देखील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. चित्रपटाच्या सुरुवातीलाच नईमचा मृत्यू होतो, तर 'हमजा' म्हणजेच रणवीर सिंग रेहमानच्या धाकट्या मुलाला वाचवण्यात यशस्वी होतो. रेहमानच्या या धाकट्या मुलाची भूमिका नक्की कोणी केली आहे, हे जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सुक आहे.
कोण आहे अजिंक्य मिश्रा?
ही भूमिका बिहारच्या भोजपूरचा रहिवासी असलेल्या अजिंक्य मिश्रा याने साकारली आहे. अजिंक्यचे वय अवघे १४ वर्षे आहे. तो एक लोकप्रिय बालकलाकार असून त्याने अनेक चित्रपट आणि टीव्ही जाहिरातींमध्ये काम केले आहे. अजिंक्य मिश्रा अलीकडेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'सिंगल पापा' या सीरिजमध्येही दिसला होता. यामध्ये त्याने नेहा धूपियाच्या मुलाची भूमिका साकारली होती. 'सिंगल पापा'मध्ये कुणाल खेमू मुख्य भूमिकेत आहे.
सर्वात खास गोष्ट म्हणजे 'धुरंधर'मध्ये अजिंक्यचा एकही संवाद नाही, तरीही केवळ आपल्या वावरण्याने आणि अभिनयाने त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अजिंक्यला वयाच्या तिसऱ्या वर्षापासूनच अभिनयाची आवड होती, त्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला ॲक्टिंग स्कूलमध्ये प्रवेश मिळवून दिला. छोट्या-मोठ्या जाहिरातींनंतर २०१९ मध्ये 'दिल तो हॅप्पी है जी' या मालिकेतून त्याला पहिला ब्रेक मिळाला होता.