जयाप्रदा यांना धावत्या ट्रेनमध्ये करावी लागलेली अंघोळ, अभिनेत्रीने सांगितला त्याकाळचा स्ट्रगल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 11:13 IST2026-03-13T11:13:09+5:302026-03-13T11:13:52+5:30
Jaya prada: जया प्रदा यांनी तेलुगू, तमिळ आणि कन्नड अशा अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला.

जयाप्रदा यांना धावत्या ट्रेनमध्ये करावी लागलेली अंघोळ, अभिनेत्रीने सांगितला त्याकाळचा स्ट्रगल
हेमा मालिनी, श्रीदेवी, जयाप्रदा, मिनाक्षी शेषाद्री या अभिनेत्रींनी बॉलिवूडचा एक काळ गाजवला आहे. अभिनयासह या अभिनेत्री नृत्यामध्येही तरबेज होत्या. यात खासकरुन जयाप्रदा यांच्या नृत्याची त्याकाळी बरीच चर्चा व्हायची. विशेष म्हणजे त्यांच्या उत्तम नृत्यकौशल्यामुळेच त्यांना पहिल्या सिनेमाची ऑफर मिळाली होती. जया प्रदा (Jaya prada) यांनी तेलुगू, तमिळ आणि कन्नड अशा अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलं. त्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला.
१९७९ मध्ये निर्माता-दिग्दर्शक विश्वनाथ यांच्या 'सरगम' सिनेमात जयाप्रदा झळकल्या. हा सिनेमा त्याकाळी हिट ठरला आणि रातोरात त्या स्टार झाल्या. परंतु, या सिनेमासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. विशेष म्हणजे या सिनेमातील त्यांचा एक किस्सा बराच चर्चेत राहिला. या सिनेमासाठी त्यांना चक्क धावत्या ट्रेनमध्ये अंघोळ करावी लागली होती. जयाप्रदा यांनी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीमध्ये ट्रेनमध्ये घडलेला हा किस्सा सांगितला.
''एकदा मला चालत्या ट्रेनमध्येच आंघोळ करावी लागली होती. कारण आम्हाला लोकेशनवर पोहोचल्या पोहोचल्या शूटींग करायचं होतं. दिग्दर्शकाला सकाळच्या पहिल्या किरणात सीन शूट करायचा होता. मी २४ तास काम करत होते. मी स्वत:च माझं मेकअप करायचं शिकले होते. सिनेमाच्या डिमांडनुसार, आम्हाला एका लोकेशनवरून दुसऱ्या लोकेशनवर जावं लागत होतं. आम्ही कशा कशा स्थितीत शूटींग केलं. आज जेव्हा मी ऐकते की, व्हॅनिटी व्हॅन नसल्याने तरूणी सहकार्य करत नाही वगैरे ते पाहून मली फार चक्रावून जाते'', असं जया प्रदा म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, ''या सिनेमातील डफलीवाले डफली बजा, या गाण्याचं शूट करायचं होतं. परंतु, या गाण्यासाठी तयार व्हायला माझ्याकडे पुरेसा वेळ नव्हता. त्यामुळे मला नाइलाजाने धावत्या ट्रेनमध्येच अंघोळ करावी लागली होती.'' दरम्यान, जयाप्रदा त्या काळातील टॉप अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी तोहफा, औलाद, शराबी, मवाली सारख्या सुपरहिट सिनेमात काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.