असं काय घडलं होतं की, सेटवर गाण्याच्या शूटिंगदरम्यान मुलींनी अक्षय कुमारवर फेकलेली १०० अंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 18:24 IST2025-11-03T18:23:49+5:302025-11-03T18:24:46+5:30
Akshay Kumar : एखाद्या अभिनेत्यावर अंडे फेकणे ही काही सामान्य गोष्ट नाही. एकदा बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारवर एक-दोन नाही, तर तब्बल १०० अंडी फेकण्यात आली होती आणि तेही मुलींनी हे कृत्य केले होते. या घटनेनंतर अभिनेत्याची जी प्रतिक्रिया होती, ती पाहून कोरिओग्राफरही चकित झाला होता.

असं काय घडलं होतं की, सेटवर गाण्याच्या शूटिंगदरम्यान मुलींनी अक्षय कुमारवर फेकलेली १०० अंडी
अक्षय कुमार जेव्हा जेव्हा रुपेरी पडद्यावर येतो, तेव्हा आपल्या अभिनयाने आणि एनर्जीने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतो. ९० च्या दशकात तो रोमँटिक आणि ॲक्शन हिरो म्हणून ओळखला जात होता. २००० च्या दशकात त्याने कॉमेडीच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. ज्यांनी कोणी अक्षय कुमारसोबत काम केले आहे, ते त्याच्या वेळेच्या काटेकोरपणाचे खूप कौतुक करतात. जेव्हा जेव्हा तो एखादे काम करतो तेव्हा तो त्यात आपले १०० टक्के देतो. नुकतेच अक्षयसोबत काम केलेल्या एका कोरिओग्राफरने अभिनेत्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. त्याचबरोबर अक्षयवर फेकलेल्या १०० अंड्यांचा मनोरंजक किस्साही सांगितला.
बॉलिवूड कोरिओग्राफर चिन्नी प्रकाश यांनी 'फ्रायडे टॉकीज'ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. चिन्नी यांनी सांगितले की, जेव्हा मुलींनी त्यांच्यावर अंडी फेकली, तेव्हा अभिनेत्याच्या प्रतिक्रियेने त्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. 'खिलाडी' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षयवर अंडी फेकण्यात आली होती. चिन्नी प्रकाश म्हणाले, "अक्षय खूप मेहनती आहे आणि तो आपले १०० टक्के देतो. मी त्याच्यासोबत जी २५-५० गाणी शूट केली आहेत, त्यापैकी कोणत्याही गाण्यामध्ये त्याने कधीही स्टेप बदलायला सांगितली नाही. 'खिलाडी' चित्रपटातील एका गाण्याच्या सीनमध्ये अक्षयवर १०० अंडी फेकण्यात आली होती. मुलींना अक्षयवर अंडी फेकायची होती आणि जेव्हा अंडे लागते तेव्हा दुखते, पण त्यानंतर येणारा वास त्याहून वाईट असतो, ते लवकर जात नाही. या सगळ्या नंतरही अक्षय एक शब्दही बोलला नाही. तो खूप मेहनती आहे आणि त्याचे कोणतेही नखरे नाहीत. तो खूप डाऊन-टू-अर्थ आहे. मी त्याच्यापेक्षा जास्त मेहनती अभिनेता कधीच पाहिला नाही आणि तो खूप समर्पित आहे."
तीन दिवसांत शूट झालेलं हे गाणं
चिन्नी प्रकाश यांनी सांगितले की, २० वर्षानंतरही अक्षयची वर्तणूक अजिबात बदललेले नाही. तो काहीही करण्यासाठी तयार असतो. त्याला १० मजल्यांवरून उडी मारायला सांगितली, तरी तो तयार होईल. पुढे कोरिओग्राफरने 'मोहरा' चित्रपटातील 'तू चीज बड़ी है मस्त मस्त' या गाण्याचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, "जेव्हा मी पहिल्यांदा हे गाणे ऐकले, तेव्हा मला वाटले की ही एक गझल आहे. हे खूप संथ गाणे आहे. अक्षय म्हणाला की, हे गाणे हिट होईल. आम्ही ते गाणे फक्त रात्रीच्या वेळी शूट केले, कारण कोणत्याही कलाकाराकडे डेट्स नव्हत्या. माझ्याकडेही वेळ नव्हता, अक्षय आणि रवीनाकडेही नव्हता. आम्ही ते गाणे ३ कॅमेऱ्यांनी ३ रात्रींमध्ये शूट केले, आणि सर्व लोक अर्धवट झोपेतच परफॉर्म करत होते."