Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 16:47 IST2025-05-02T14:52:07+5:302025-05-02T16:47:10+5:30
आमिर खानने आज Waves समिटमध्ये निर्माता रितेश सिधवानी आणि अजय बिदली यांच्यासोबत चर्चा केली.

Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
मुंबईत कालपासून Waves Summit 2025 चं आयोजन करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या परिषदेसाठी पहिल्या दिवशी उपस्थिती लावली. भारतीय सिनेसृष्टीतील अनेक तारे तारका परिषदेसाठी उपस्थित होते. पंतप्रधान मोदींनी सर्वांना मार्गदर्शन केलं आणि प्रोत्साहन दिलं. आज या परिषदेचा दुसरा दिवस आहे. अभिनेता आमिर खानने आज परिषदेत हजेरी लावत भारतीय सिनेमासमोरील आव्हानांवर भाष्य केलं आहे.
आमिर खानने आज Waves समिटमध्ये निर्माता रितेश सिधवानी आणि अजय बिदली यांच्यासोबत चर्चा केली. तो म्हणाला, "भारतीय सिनेसृष्टीत जेव्हा कोणताही सिनेमा सुपरहिट होतो तेव्हा त्याचा फुटफॉल काय असतो? जगभरात आपल्या देशाची ओळख सिनेप्रेमी म्हणून होते. दरवर्षी आपल्या देशात सर्वात जास्त सिनेमांची निर्मिती होते. तर आपल्या देशातील केवळ २ टक्के लोक सिनेमा पाहण्यासाठी थिएटरमध्ये जातात. ९८ टक्के लोक सिनेमावर पैसे खर्च करत नाहीत. मला वाटतं भारतात जास्तीत जास्त थिएटर्स उभारले पाहिजे. देशातील अनेक भागांमध्ये तर थिएटर्सच नाहीत. जोपर्यंत आपण संपू्र्ण देश व्यापणार नाही आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत आपला सिनेमा पोहोचवणार नाही तोपर्यंत आपण सिनेमालविंग देश होणार नाही. अनेक लोक असते आहेत ज्यांना सिनेमा पाहण्यासाठी जायचं आहे मात्र थिएटर्सच नाहीत."
इतर देशांशी तुलना करत आमिर म्हणाला की, "१.४ बिलियन लोकसंख्या असताना आपल्याकडे केवळ १० हजार थिएटर आहेत. यातही फक्त ९२०० थिटटरमध्ये सिनेमा लागतो. अमेरिकेचं उदाहरण घ्यायचं तर त्यांच्याकडे ४० हजार स्क्रीन्स आहेत आणि चीनमध्ये ९० हजार स्क्रीन्स आहेत. याचाच अर्थ आपण समजू शकतो की भारतीय सिनेमाकडे आणखी खूप क्षमता आहे ज्याला आपण एक्स्प्लोर करु शकतो."