वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा उद्घाटन समारंभ, 'या' तारखेला मुंबईत सिनेरसिकांना मिळणार पर्वणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 10:07 IST2025-09-26T10:06:32+5:302025-09-26T10:07:55+5:30
वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा दणक्यात शुभारंभ झाला. मुंबईत या तारखेपासून सिनेरसिकांना खास पर्वणी मिळणार आहे. त्यामुळे सर्वांना उत्सुकता आहे.

वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा उद्घाटन समारंभ, 'या' तारखेला मुंबईत सिनेरसिकांना मिळणार पर्वणी
मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA) येथे वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा (WIFF) उद्घाटन समारंभ पार पडला. या कार्यक्रमामुळे इंडस्ट्रीतील महत्त्वाचे आणि आघाडीचे विचारवंत सिनेमांच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी एकत्र आले. या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी विविध विषयांवर दिलखुलास चर्चा केली. अभिनेत्री रिचा चढ्ढा यांनी या चर्चेचं सूत्रसंचालन केलं, तर सुधीर मिश्रा, बॉबी बेदी, शूजित सरकार, रजत कपूर, दीपा गहलौत आणि श्रीधर रंगायन यांसारख्या प्रसिद्ध तज्ज्ञांनी आपले महत्त्वपूर्ण विचार मांडले.
या चर्चेदरम्यान स्वतंत्र सिनेमातील (Independent Cinema) नवीन ट्रेंड्स आणि नवनवीन कल्पनांवर उत्स्फूर्त संवाद झाले.
उपस्थित असलेल्या चित्रपट निर्मात्यांनी अत्यंत क्रिएटिव्ह विचार मांडले. त्यामुळे प्रेक्षकांना प्रेरणा मिळाली.
दिग्दर्शक शूजित सरकार आणि अभिनेत्री रिचा चढ्ढा यांनी मराठी आणि मल्याळम सिनेमाच्या यशस्वी उदाहरणांचा उल्लेख केला, जो देशभरातील चित्रपट निर्मात्यांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो.
आगामी फेस्टिव्हल आणि आयोजक
वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलला टीआरआयएस (Tuli Research Centre for India Studies) यांचा 'नॉलेज अँड एज्युकेशन पार्टनर' (Knowledge and Education Partner) म्हणून, तसेच अपलॉज एंटरटेनमेंट आणि इतरांचे सहकार्य लाभलं आहे.
हा मुख्य फेस्टिव्हल २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर या कालावधीत वर्सोवा, आराम नगर येथील रंगशीला थिएटर येथे होणार आहे. यामध्ये निवडक इंडी चित्रपट, पॅनेल चर्चा आणि मास्टर क्लासेसचे आयोजन करण्यात येणार आहे.
यावेळी फेस्टिव्हलच्या संस्थापकांनी आपले विचार मांडले. फेस्टिव्हलच्या संस्थापिका आणि चित्रपट निर्मात्या विंटा नंदा म्हणाल्या, "WIFF हा केवळ एक चित्रपट महोत्सव नाही, तर ती एक चळवळ आहे. विविध विचारांना एकत्र आणणं, सर्जनशीलतेचा उत्सव साजरा करणं आणि नव्या आणि स्वतंत्र कथेला प्रेरणा देणं, हीच या महोत्सवाची खरी शक्ती आहे, असं मला वाटते."
चित्रपट समीक्षक आणि फेस्टिव्हलच्या संस्थापिका दीपा गहलौत यांनी सांगितलं की, "उत्कृष्ट फिल्म्स आणि सहयोगी कार्यक्रमांची रूपरेषा ठरवताना WIFF टीम खूप उत्साहित आहे. आम्हाला आशा आहे की चित्रपटप्रेमी प्रेक्षक या महोत्सवाचा तितकाच आनंद घेतील, जितका आनंद आम्हाला तो आयोजित करताना आला."