विवेक अग्निहोत्रींचा 'द व्हॅक्सीन वॉर' बॉक्स ऑफिसवर आपटला; पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 13:06 IST2023-09-29T13:05:42+5:302023-09-29T13:06:07+5:30
The Vaccine War : 'द व्हॅक्सीन वॉर'ची बॉक्स ऑफिसवर फिकी जादू, विवेक अग्निहोत्रींच्या चित्रपटाने जमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला

विवेक अग्निहोत्रींचा 'द व्हॅक्सीन वॉर' बॉक्स ऑफिसवर आपटला; पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी
'द काश्मीर फाइल्स' सुपरहिट ठरल्यानंतर विवेक अग्निहोत्री 'द व्हॅक्सीन वॉर' चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. २८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या मुहुर्तावर 'द व्हॅक्सीन वॉर' चित्रपट हा चित्रपट प्रदर्शित झाला. करोना काळात भारताच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या कोव्हिड प्रतिबंधक लस संशोधनाचा प्रवास या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर मांडण्यात आला आहे. 'द काश्मीर फाइल्स'नंतर विवेक अग्निहोत्रींच्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. पण, हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षेस खरा उतरला नसल्याचं चित्र आहे.
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित 'द व्हॅक्सीन वॉर' चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत. बॉक्स ऑफिसच्या आकड्यांनुसार या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. अपेक्षेपेक्षा 'द व्हॅक्सीन वॉर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप कमी कमाई केली आहे. पहिल्या दिवशी 'द व्हॅक्सीन वॉर' सिनेमाला बॉक्स ऑफिसवर केवळ १ कोटी ३० लाखांचा गल्ला जमवता आला आहे. त्यामुळे इतर चित्रपटांच्या गर्दीत 'द व्हॅक्सीन वॉर'ला बॉक्स ऑफिसवर तग धरता येईल का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
'द व्हॅक्सीन वॉर' चित्रपटात नाना पाटेकर, अनुपम खरे, पल्लवी जोशी, गिरीजा ओक या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. 'द व्हॅक्सीन वॉर'बरोबर २८ सप्टेंबरला 'फुकरे ३' आणि कंगना रणौतचा 'चंद्रमुखी २' हे दोन चित्रपटही प्रदर्शित झाले. 'फुकरे ३'ने पहिल्या दिवशी ८.५ कोटींची कमाई केली आहे. तर 'चंद्रमुखी २' ने बॉक्स ऑफिसवर ७.५० कोटींचा गल्ला जमवला.