परदेशात नियमांचं उल्लंघन करणं पडलं महागात! प्रसिद्ध कलाकारांना पोलिसांनी घेतलेलं ताब्यात, दिग्दर्शक म्हणाले- "रात्री २ वाजता..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 15:54 IST2025-11-17T15:45:50+5:302025-11-17T15:54:16+5:30
आऊटडोर शूटमध्ये इंडस्ट्रीतील नावाजलेल्या कलाकारांना परदेशात झालेली अटक, दिग्दर्शकाने सांगितला किस्सा

परदेशात नियमांचं उल्लंघन करणं पडलं महागात! प्रसिद्ध कलाकारांना पोलिसांनी घेतलेलं ताब्यात, दिग्दर्शक म्हणाले- "रात्री २ वाजता..."
Bollywood Cinema: बॉलिवूडमध्ये आजपर्यंत अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. परंतु, त्यातील असे काही चित्रपट आहेत ज्यांनी अक्षरश: प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं.या चित्रपटांमध्ये 'विश्वात्मा' चं नाव आवर्जून घेतलं जातं. साल १९९२ मध्ये विश्वात्मा हा चित्रपट प्रदर्शित झाला. सनी देओल, दिव्या भारती,नसीरुद्दीन शाह आणि चंकी पांडे या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या सिनेमाला प्रेक्षकांची चांगली दाद मिळाली. जबदरस्त अॅक्शन आणि चित्रपटातील डायलॉग्जन सिनेप्रेमींची मनं जिंकली. त्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा हा एक सिनेमा होता. मात्र, या चित्रपटाचं आऊटडोर शूटिंगदरम्यान, एका कलाकाराची चूक अनेकांना महागात पडली असती.
'विश्वात्मा' सिनेमाचं बरंचसं शूट हे परदेशात झालं होतं. तर काही शूटिंग हे आफ्रिका आणि नैरोबी, मोम्बासा या अशा ठिकाणांवर शूट करण्यात आले होते. मात्र,याचदरम्यान, नैरोबीमध्ये नियमाचं उल्लंघन केल्यामुळे दोन कलाकारांना तेथील पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. नेमकं काय घडलेलं याबद्दल दिग्दर्शक राजीव राय यांनी खुलासा केला आहे. द फ्रायडे टॉकीज सोबत संवाद साधतना राजीव यांनी विश्वात्मा सिनेमाच्या शूटिंगचे अनेक किस्से शेअर केले. या मुलाखतीत सिनेमाच्या शूटिंगबद्दल बोलताना राजीव राय म्हणाले, "परदेशात शूटिंग करण्याचं काही विशिष्ट कारण नव्हतं. पण, कथानकानुसा, खलनायक परदेशात पळून जातो असं दाखवण्यात आलं होतं. आफ्रिका माझ्यासाठी शूटिंगसाठी स्वस्त देश होता. शिवाय त्यात अॅक्शन सीन्सही होते.तिथे माझे काही कॉन्टॅक्टही होते.त्यामुळे शूटिंगसाठी मला त्यांच्याकडून खूप पाठिंबा मिळाला."
मग पुढे राजीव म्हणाले की, त्यावेळी नैरोबीमध्ये रात्रीच्या वेळेस फिरण्यास मनाई होती, त्यांचे काही नियम होते.पण,युनिटमध्ये असे काही लोक होते त्यांना एका जागेवर करमत नव्हतं. तो किस्सा शेअर करत त्यांनी सांगितलं,"नैरोबीमध्ये तुम्ही रात्रीच्या वेळेस फिरू शकत नाही. शिवाय तुम्हाला डॉलर्स, एक पैसाही घेऊन जाण्याची परवानगी नसते. त्याचदरम्यान, आमचे काही दोन कलाकार रात्री २ वाजता बाहेर फिरताना सापडले आणि त्यांना ताब्यात घेण्यात आलं.नैरोबीमध्ये जर तुम्ही तिथे पकडला गेलात तर ते तुम्हाला गोळी सुद्धा घालू शकतात. तो कडक नियम असलेला देश होता.
"ती घटना अजूनही कोणी विसरलेलं नाही..."
या मुलाखतीमध्ये राजीव राय यांनी कोणाचंही नाव न घेतल नाही. त्यानंतर त्यांच्या सुटकेबद्दल सांगताना ते म्हणाले,"माझ्या काही ओळखीतले दिग्दर्शक तिथल्या काही जणांच्या संपर्कात होते. त्यांचे तिथल्या काही राजकारण्यांशी आणि स्थानिकांसोबत कनेक्शन होते. त्यांच्या मदतीने त्यांची सुटका झाली.त्यानंतर कलाकारांना सख्त ताकीद दिली की, रात्रीच्या कुठेही बाहेर जाऊ नका असे सांगितले. सगळं काही सुरळित झालं. चित्रपट हिट झाला,पण ती घटना अजूनही कोणी विसरलेलं नाही."