Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 01:01 IST2025-06-13T00:57:51+5:302025-06-13T01:01:32+5:30
Vikrant Massey's Cousin Dies in Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विक्रांतच्या कुटुंबातील अत्यंत जवळच्या व्यक्तीचं यात निधन झालं.

Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
Clive Kunder Death: अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसलाय. या दुर्घटनेत अनेक कुटुंबानी त्यांच्या जवळच्या व्यक्तींना गमावलंय. अशातच मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे, या दुर्घटनेत 'मिर्झापूर', '12th फेल' फेम लोकप्रिय अभिनेता विक्रांत मेस्सीच्या (Vikrant Massey) जवळच्या व्यक्तीचं निधन झालंय. विक्रांत ज्याला भाऊ मानायचा आणि त्याच्या कुटुंबाचा अत्यंत जवळचा व्यक्ती क्लाइव्ह कुंदरचं निधन झालंय. क्लाइव्ह हा एक वैमानिक होता. या दुर्घटनेत क्लाइव्हचं निधन झाल्याने विक्रांत आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विक्रांत मेस्सीने पोस्ट करुन दिली माहिती
विक्रांत मेस्सीने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ही पोस्ट शेअर केली आहे. विक्रांत लिहितो की, "कोणीही कल्पना केली नव्हती अशा अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेच्या दुःखद अपघातात ज्यांना आपला जीव गमवावा लागला अशा लोकांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तींना जे दुःख झालं, त्याचा विचार करुन मी खूप भावुक झालो आहे."
"याशिवाय या दुर्घटनेत माझे काका क्लिफोर्ड कुंदर यांनी त्यांचा मुलगा क्लाइव्ह कुंदरला गमावलं आहे. क्लाइव्ह त्यावेळी दुर्दैवाने त्या फ्लाइटमध्ये फर्स्ट ऑफिसर म्हणून काम करत होता. या दुःखातून सावरण्यासाठी देव माझ्या काकांच्या परिवाराला शक्ती देवो", अशा शब्दात विक्रांतने भावुक पोस्ट केली आहे. विक्रांतने ही पोस्ट शेअर करुन क्लाइव्हला हा त्याच्या नात्यातील नसून तो त्याच्या फॅमिली फ्रेंडमधील एक सदस्य होता, असंही सांगितलं आहे. क्लाइव्हचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याने विक्रांतला खूप दुःख झालं आहे. ज्या विमानाचा अपघात झाला, त्या विमानासाठी को-पायलट म्हणून क्लाइव्ह जबाबदारी सांभाळत होता.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत एकाचा जीव वाचला
या अपघातग्रस्त विमानात देशातील आणि परदेशी असे एकूण २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर होते. यापैकी एका प्रवाशाचा जीव वाचल्याची चांगली घटना घडली आहे. मी त्या प्रवाशाला भेटलो आहे. डीएनए चाचणी आणि प्रवाशांची ओळख पटवल्यानंतरच मृतांचा आकडा अधिकृतपणे जाहीर केला जाईल, असे अमित शाह म्हणाले. याचबरोबर गुजरात सरकारने सर्व आपत्ती व्यवस्थापन युनिट्सना सतर्क केले आणि एकत्रितपणे बचाव कार्य सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले. या विमानातून एकूण २४२ प्रवासी लंडनला जाण्यासाठी प्रवास करत होते.