"दिग्दर्शकांकडून कथा ऐकायला...", विजय सेतुपतीची मराठी इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 15:43 IST2026-01-30T15:42:54+5:302026-01-30T15:43:37+5:30
विजय सेतुपतीचा 'गांधी टॉक्स' मुकपट रिलीज झाला आहे. मराठी दिग्दर्शकानेच सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.

"दिग्दर्शकांकडून कथा ऐकायला...", विजय सेतुपतीची मराठी इंडस्ट्रीत काम करण्याची इच्छा, म्हणाला...
'महाराजा' सिनेमामुळे साउथ अभिनेता विजय सेतुपती मधल्या काळात चर्चेत आला होता. अनुराग कश्यपने सिनेमात खलनायकाचं काम केलं होतं. विजय सेतुपतीच्या अभिनयाचे तर सगळेच चाहते झाले. साउथमध्ये तर तो आघाडीचा अभिनेता आहेच पण आता बॉलिवूडमध्येही तो लोकप्रिय झाला आहे. त्याचा 'गांधी टॉक्स' मुकपट नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमात मराठमोळा सिद्धार्थ जाधवही आहे. नुकतंच एका मुलाखतीत त्याने मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
'गांधी टॉक्स'हा २०२६ मध्ये रिलीज झालेला पहिला मुकपट आहे. मराठी दिग्दर्शक किशोर बेलेकरने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमात विजय सेतुपती, सिद्धार्थ जाधव, अदिती राव हैदरी, अरविंद सामी यांच्या भूमिका आहेत. नुकतंच विजय सेतुपती, सिद्धार्थ जाधव आणि सिद्धार्थने एबीपी माझा कट्ट्यावर हजेरी लावली. यावेळी विजय सेतुपती म्हणाला, "सिद्धार्थबद्दल मी बोललोच. तो मराठी थिएटर, मराठी इंडस्ट्रीतून आहे हे तो अभिमानाने सांगतो. किशोरही मराठी इंडस्ट्रीतीलच आहे. मी त्यांना नेहमी म्हणतो की मराठीत आणखी मोठमोठे सिनेमे बनले पाहिजेत आणि मलाही मराठी इंडस्ट्रीत काम करायचं आहे. मी त्यांना तसं सांगितलं आहे. मी जास्त चित्रपट पाहिले नाहीत त्यामुळे कोण कोण चांगले दिग्दर्शक आहेत ते मला सांगा त्यांच्याकडून मी स्क्रिप्ट ऐकायला नक्कीच तयार आहे. मी मराठी बोलायचाही प्रयत्न करेन."
विजय सेतुपतीने २०२४ साली आलेल्या 'मेरी ख्रिसमस'मध्ये काम केलं होतं. हा त्याचा पहिला हिंदी सिनेमा होता. यात त्याच्यासोबत कतरिना कैफ दिसली होती. तर त्याआधी २०२३ साली आलेल्या 'फर्जी' वेबसीरिजमधून त्याने हिंदीत पदार्पण केलं होतं. शाहिद कपूर यामध्ये मुख्य भूमिकेत होता. त्यांची ही सीरिज खूप लोकप्रिय झाली होती.