"मोबाईल हरवण्याची भीती वाटते...", बाबा झाल्यानंतर विकी कौशलला का सतावतेय ही चिंता?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 16:27 IST2026-01-08T16:26:01+5:302026-01-08T16:27:04+5:30
विकी कौशल असं का म्हणतोय?

"मोबाईल हरवण्याची भीती वाटते...", बाबा झाल्यानंतर विकी कौशलला का सतावतेय ही चिंता?
अभिनेता विकी कौशल बाबा झाल्याने आनंदात आहे. विकी-कतरिनाचा मुलगा काल २ महिन्यांचा झाला. दोघांनी त्याचं नावंही रिव्हील केलं. विहान कौशल असं त्याचं नाव ठेवण्यात आलं. युनिक नावांच्या ट्रेंडमध्ये विकी आणि कतरिनाने लेकाचं नाव एकदम साधं सरळ निवडल्याने त्यांचं कौतुक होत आहे. दरम्यान सध्या विकीला त्याचा मोबाईल हरवण्याची भीती सतावत आहे. याचं कारणही त्याने सांगितलं.
'जस्ट टू फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत विकी कौशल म्हणाला, "बाबा होण्याचा अर्थ काय हे मी अजूनही समजलेलो नाही. पण मी तुम्हाला सांगतो की खरंच ही एक जादुई भावना आहे. कधी कधी मला काय वाटतं हे शब्दात न मांडता येणारं आहे. हे आपण केवळ फील करु शकतो. बाबा होणं या अनुभवाला कोणतंही सुंदर विशेषण नाही. या संमिश्र भावना आहेत. कधी तुम्हाला वेगळंच वाटू शकतं तर कधी एकदम आदर्श व्हावंसं वाटू शकतं. कधी मला वाटतं मी माझ्या वागण्यावर लक्ष दिलं पाहिजे तर कधी वाटतं आपण जसे आहोत तसेच ठीक आहोत."
तो पुढे म्हणाला,"सध्या वेळ खूप मोलाची वाटते. कारण सगळं लक्ष घरी जायच्या दिशेने लागलेलं असतं. पहिल्यांदाच मला माझा मोबाईल फोन हरवण्याची भीती वाटत आहे. आधी मला असे विचार येत नव्हते पण आता मोबाईलमध्ये माझ्या लेकाची बरेच फोटो, व्हिडीओ आहेत जे पाहून मी विचार करतो की, बस..मोबाईल हरवला नाही पाहिजे. लेकासोबत वेळ घालवण्याची इच्छा होत असते. हे खूपच अनमोल आहे. हा मला मिळालेला सर्वात मोठा आशीर्वाद आहे."