मध्य प्रदेशनंतर आणखी एका राज्यानं ओळखली छत्रपती संभाजी राजेंची कीर्ती, 'छावा' केला टॅक्स फ्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 13:09 IST2025-02-23T13:09:12+5:302025-02-23T13:09:24+5:30
विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट महाराष्ट्राबाहेर करमुक्त करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशनंतर आणखी एका राज्यानं ओळखली छत्रपती संभाजी राजेंची कीर्ती, 'छावा' केला टॅक्स फ्री
Chhaava Tax Free: 'छावा' (Chhaava) या हिंदी चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात आणि विदेशातही 'छावा'चीच हवा आहे. संभाजी मराहाजांचं कार्य, त्यांचं शौर्य, त्यांचा त्याग पाहून प्रेक्षक रडताना दिसताय. लोक वेळात वेळ काढून महाराजांचा इतिहास पाहायला थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. मध्य प्रदेशानंतर आता आणखी एका राज्याने हा चित्रपट करमुक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
गोव्यात 'छावा' करमुक्त करण्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून ही माहिती दिली. ते म्हणाले की, "छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आणि बलिदानावर आधारित "छावा" हा चित्रपट गोव्यात करमुक्त होणार आहे, हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. विकी कौशल अभिनीत हा चित्रपट देव, देश आणि धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य आणि धैर्याचे चित्रण करतो. या चित्रपटानं गौरवशाली इतिहास पडद्यावर आणला आहे. मुघल आणि पोर्तुगीजांविरुद्ध शौर्याने लढणाऱ्या हिंदवी स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचं बलिदान आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे".
काही दिवसांपुर्वी मध्य प्रदेशचे ख्यमंत्री मोहन यादव यांनीही 'छावा' राज्यात करमुक्त करण्याची घोषणा केली होती. 'छावा' चित्रपटाबद्दल बोलायचे तर शिवाजी सावंत यांच्या कांदबरीवर आधारित हा सिनेमा आहे. ज्यामध्ये छत्रपती संभाजी महारांजाचे जीवन दाखवण्यात आले आहे. या सिनेमात विकी कौशलने (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई भोसलेंच्या भूमिकेत आहे. अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. या संतोष जुवेकर, शुंभकर एकबोटे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये ही मराठी कलाकारांची फौज आहे.
लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित 'छावा' बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम रचत आहे. सिनेमानं प्रदर्शनानंतर ९ दिवसांत संपूर्ण भारतात एकूण २९३.९१ कोटी रुपयांची कमाई केली असून कमाईचा आकडा सातत्याने वाढत आहे. रविवारी सिनेमा भारतात ३०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेईल. 'छावा' हा २०२५ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या कमाईचा वेग पाहता, आता हे स्पष्ट झालंय की, बॉक्स ऑफिसवर 'छावा' लंबी रेस का घोड़ा ठरेल.