विकी कौशलची भावनिक पोस्ट, 'मसान'च्या शूटिंगचे अनसीन फोटो शेअर करत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:41 IST2025-07-25T13:40:54+5:302025-07-25T13:41:10+5:30
"मुसाफ़िर हैं हम भी, मुसाफ़िर हो तुम भी..." बॉलिवूडमध्ये दहा वर्ष पूर्ण होताच काय म्हणाला विकी कौशल?

विकी कौशलची भावनिक पोस्ट, 'मसान'च्या शूटिंगचे अनसीन फोटो शेअर करत म्हणाला...
मुंबईतील चाळीत जन्माला आलेला अभिनेता विकी कौशल हा आज मोठ्या स्क्रीनवर अक्षरश: धुमाकूळ घालतोय. प्रभावी अभिनेत्यांच्या यादीत आज त्याचं नाव आवर्जुन घेतलं जातं. टॉपच्या अभिनेत्यांपैकी एक असणाऱ्या विकी कौशलला सिनेमा इंडस्ट्रीत येऊन १० वर्ष पूर्ण झाले आहेत. विकी कौशलची दशकपूर्ती झाल्याने तो सोशल मीडियात ट्रेंड करतोय. त्याच्यावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. विकी कौशलनेही सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
विकी कौशल इन्स्टाग्रामवर मसान चित्रपटादरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्टमधून विकीनं आपल्या प्रवासाबद्दल कृतज्ञता आणि पुढील वाटचालीसाठी आशावाद व्यक्त केला आहे. त्यानं लिहलं, "असं वाटतंय की कालची गोष्ट आहे. पण, दहा वर्षं पूर्ण झालीत. अजून खूप काही शिकायचं आहे, खूप पुढे जायचं आहे... सर्व गोष्टींसाठी मनापासून आभार", असं म्हटलं. यासोबतच त्याने "मुसाफ़िर हैं हम भी, मुसाफ़िर हो तुम भी...किसी मोड़ पर फिर मुलाक़ात होगी" या शायरीतून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याच्या या भावनिक पोस्टवर अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
मसान ते छावा
विकीने 'मसान' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. या आधी विकी सहायक दिग्दर्शक म्हणून काम करायचा. विकी 'गँग्स ऑफ वासेपूर'साठी सहायक दिग्दर्शक होता. विकीनं अभिनेता म्हणून 'बॉम्बे वेलवेट' चित्रपट केला होता. पण, या चित्रपटामधील त्याची भूमिका फारशी गाजली नव्हती. पण, त्यानंतर आलेल्या 'मसान'मध्ये तो मुख्य अभिनेता होता. त्यानंतर आलेल्या 'राझी' आणि 'संजू'मधील विकीच्या भुमिका गाजल्या. या चित्रपटातून विकी प्रेक्षकांच्या निदर्शनास आला.
'उरी – द सर्जिकल स्ट्राइक' चित्रपटामुळे त्याच्या करिअरला एक वेगळी दिशा मिळाली. त्यानंतर अनेक सुपरहिट चित्रपटात विकीने काम केलं. यानंतर 'सरदार उधम', 'जरा हटके जरा बचके' , 'सॅम बहादुर' विविध धाटणीच्या भुमिका त्यानं साकारल्या. या वर्षाच्या सुरुवातीलाच 'छावा' चित्रपटातून त्यानं धमाका केला. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठ्या-मोठ्या सिनेमांचे रेकॉर्ड मोडले. 'छावा' हा चित्रपट विकीच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वाधिक ओपनिंग देणारा चित्रपट ठरला. 'छावा'नंतर आता विकी हा संजय लीला भन्साळी यांच्या आगामी "लव्ह अँड वॉर" (Love & War) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विकीने गेल्या दशकात केवळ बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं नाही, तर समीक्षकांचंही कौतुक मिळवलं.