'हा क्षण नक्कीच तुझ्यासाठी...", विकी जैनची नवी इनिंग; अंकिता लोखंडेची नवऱ्यासाठी खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 16:34 IST2025-11-07T16:33:10+5:302025-11-07T16:34:30+5:30
अंकिताला वाटतोय नवऱ्याचा अभिमान, म्हणाली...

'हा क्षण नक्कीच तुझ्यासाठी...", विकी जैनची नवी इनिंग; अंकिता लोखंडेची नवऱ्यासाठी खास पोस्ट
अंकिता लोखंडे टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. 'पवित्र रिश्ता' मालिकेमुळे तिला सगळेच ओळखतात. मात्र 'बिग बॉस'मुळे अंकिताचा नवरा विकी जैनही प्रसिद्धीझोतात आला. बिग बॉसमध्ये या कपलचं प्रेम, भांडण सगळ्यांनीच पाहिलं. नंतर विकी जैन काही रिएलिटी शोमध्येही दिसला. तर आता विकीने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे. अभिनेता म्हणून नाही तर तो निर्माता झाला आहे. इम्रान हाश्मी आणि यामी गौतम यांचा 'हक'सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाची निर्मिती विकी जैनने केली आहे. अंकिताने नवऱ्यासाठी कौतुकास्पद पोस्ट शेअर केली आहे.
अंकिताने पती विकीसाठी पोस्ट शेअर करत लिहिले, "प्रिय विकी, आज खास दिवस आहे. 'हक' रिलीज झाला आहे. तुझा निर्माता म्हणून नवा प्रवास सुरु झाला आहे. मला तुझा खूप अभिमान वाटतोय. मी तुझ्या आयुष्याचा भाग आहे यासाठी मी स्वत:ला नशिबवान समजते. म्हणूनच आज तुझ्या या आनंदाच्या क्षणात मी तुझ्यासोबत आहे. बिलासपूर ते मुंबई असा तुझा प्रेरणादायी प्रवास! तू आज सगळं तुझ्या मेहनतीने, आत्मविश्वासाने उभं केलं आहेस. मला खात्री आहे की हा क्षण तुझ्यासाठी स्वप्नवत आहे. यामागे तुझी जिद्द आणि स्वत:वर असलेला विश्वास आहे.
आयुष्यात तू कुठेही पोहोचलास तरी आपलं मूळ विसरु नकोस. असाच नम्र राहा. जेव्हा तुझ्याकडे काहीही नव्हतं फक्त स्वप्न आणि इच्छाशक्ती होती तेव्हा तुझ्यासाठी कायम उभं राहिलेल्या लोकांना कधीच विसरु नको. प्रत्येक पावलावर पाठिंबा देण्यासाठी मी कायम तुझ्यासोबत आहे. आज मला फक्त अभिमान वाटतोय, तुझी बायको असल्याचा मला गर्व आहे.
'बिग बॉस'नंतर विकी जैन 'लाफ्टर शेफ'मध्ये दिसला होता. तसंच त्याने गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'फौजी २'या वेब सीरिजमध्येही भूमिका साकारली. आता तो निर्माता म्हणून नवीन इनिंगला सुरुवात करत आहे.