दिलजित दोसांजच्या 'डिटेक्टिव्ह शेरदिल'चा ट्रेलर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 17:47 IST2025-06-10T17:47:01+5:302025-06-10T17:47:31+5:30
Diljit Dosanjh's 'Detective Sherdil' : अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझच्या 'डिटेक्टिव्ह शेरदिल' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतीच त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. आता त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

दिलजित दोसांजच्या 'डिटेक्टिव्ह शेरदिल'चा ट्रेलर प्रदर्शित
अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ(Diljit Dosanjh)च्या 'डिटेक्टिव्ह शेरदिल' (Detective Sherdil Movie) या चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतीच त्याच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. आता त्याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात दिलजीत एका गुप्तहेराची भूमिका साकारत आहे जो एका खून प्रकरणाचे गूढ उलगडतो. या चित्रपटात सस्पेन्सचा डोस आहे आणि विनोदाचाही भरणा आहे. यामध्ये नामवंत कलाकार दिसणार असून त्यात डायना पेंटी, बोमन इराणी, रत्ना पाठक शहा, चंकी पांडे, सुमीत व्यास, बनिता सिंधू, कश्मिरा इराणी यांचा समावेश आहे. ही मर्डर मिस्ट्री सगळ्यांना शेवटच्या क्षणापर्यंत खिळवून ठेवेल. 'डिटेक्टिव्ह शेरदिल' हा सिनेमा झी ५वर २० जून रोजी भेटीला येणार आहे.
एका बहारदार, अब्जाधीश उद्योजकाचा (बोमन इराणी) बुडापेस्ट इथं खून होतो. वरकरणी हेट क्राइम वाटणारी ही घटना काहीतरी दुसरंच आहे हे कळायला वेळ लागत नाही. मग, एंट्री होते, ती डिटेक्टिव्ह शेरदिल –दिलजित दोसांज साकारत असलेल्या धमाल डिटेक्टिव्हची. जो नेहमीपेक्षा वेगळा आणि अतिशय तीक्ष्ण आहे, पण एरवी कोणालाही न सुटणारी कोडी सोडवण्यात कुशल आहे. त्याच्यासोबत असते नताशा (डायना पेंटी), जी तितकीच हुशार इन्व्हेस्टिगेटर असते. तिची बुद्धी जितकी चकमदार असते, तितकं तिचं व्यक्तिमत्त्वही. कौटुंबिक रहस्यांच्या जाळ्यात दोघं खोलवर शोध घेतात तसंच धोका, अब्जावधींचं आकर्षण समोर येतं आणि केस आणखी गुंतागुंतीची, अनपेक्षित होऊन जाते. त्यानंतर पुढे जे उलगडतं, त्यात फसवेगिरीचा खेळ समोर येतो आणि प्रत्येकाकडे काहीचरी रहस्य असल्याचं कळतं. प्रत्येक नात्याची गोष्ट बदलत जाते. प्रखर विनोदबुद्धीइतकाच अंतर्ज्ञानी असलेल्या शेरदिलला फक्त एका खुनामागचं रहस्य सोडवण्यासाठी बरीच वळणं पार करावी लागतात आणि त्यानंतर कोणालाच नको असलेलं सत्य समोर आणावं लागतं.
दिलजित दोसांज म्हणाला, ‘डिटेक्टिव्ह शेरगिलची भूमिका करणं धमाल अनुभव होता. ही व्यक्तीरेखा अजब आहे आणि त्याचा स्वभावही मी वेगळेपणानं मांडला आहे. मला आशा आहे, की प्रेक्षकांना ही व्यक्तीरेखा आणि सिनेमा आवडेल.’ तर डायना पेंटी म्हणाली, नताशा पाय जमिनीवर असलेली मुलगी आहे. ती हुशार आहे, लॉजिक, शिस्त आणि अचूकतेनं जगणारी आहे. त्यामुळे या केसच्या गोंधळात तिचं गुंतणं मजेदार होतं. डिटेक्टिव्ह शेरदिलची मला आवडलेली गोष्ट म्हणजे, याचा टोन हुशार, अनपेक्षित आहे. रवी छाब्रिया यांच्याबरोबर काम करणं खास होतं. त्यांना आपल्याला काय हवंय ते स्पष्ट माहीत असतं. ते मिळूनमिसळून काम करतात आणि कलाकारांना त्यांच्या व्यक्तीरेखा फुलवण्यासाठी वाव देतात.
बोमन इराणी म्हणाले, ‘पंकज भट्टी या व्यक्तीरेखेला इतरांचं लक्ष वेधून घेणं आवडतं. त्यानं साम्राज्य उभं केलेलं आहे, पण त्याच्या मनात बरीच खळबळ आणि अव्यक्त खंत आहे, ज्यामुळे ही व्यक्तीरेखा सच्ची वाटते. डिटेक्टिव्ह शेरदिलही खिळवून ठेवणारी कथा आहे आणि त्यात नियंत्रण, सत्ता व रहस्याचा खेळ पाहायला मिळतो. कथेतली गुंतागुंत मला आकर्षक वाटली. रवी छाब्रिया यांच्या दिग्दर्शनाखाली काम करणं आनंददायी होतं. त्यांना परफॉर्मन्स आणि भावना खोलवर समजून घेता येतात, त्यामुळे प्रत्येक सीन नव्या उंचीवर जातो. झी 5 ने अतिशय दिलदारपणे या कथेला पाठिंबा दिला आहे आणि आम्ही या सिनेमात दाखवलेले पैलू प्रेक्षकांनी पाहाण्यासाठी मी उत्सुक आहे.’