टॉम क्रूझला आयुष्यात पहिल्यांदा मिळाला ऑस्कर पुरस्कार; अनिल कपूर म्हणाले- "तू यासाठी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:20 IST2025-11-18T12:16:55+5:302025-11-18T12:20:12+5:30
हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझला आयुष्यातील पहिला ऑस्कर मिळाला. त्यानिमित्त अनिल कपूर यांनी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे

टॉम क्रूझला आयुष्यात पहिल्यांदा मिळाला ऑस्कर पुरस्कार; अनिल कपूर म्हणाले- "तू यासाठी..."
हॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता टॉम क्रूझला (Tom Cruise) नुकतंच 'गव्हर्नर्स अवॉर्ड्स' समारंभात मानद ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या खास सन्मानाबद्दल अभिनेत्याला जगभरातून शुभेच्छा मिळत आहेत, ज्यात बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) यांचाही समावेश आहे. अनिल कपूर यांनी टॉम क्रूझचं खास अभिनंदन करणारी पोस्ट शेअर करत त्याच्याबद्दलचा आदर व्यक्त केला आहे.
अनिल कपूर यांची खास पोस्ट
१६ नोव्हेंबर २०२५ रोजी टॉम क्रूझला मानद ऑस्कर प्रदान करण्यात आला. या सन्मानाने अनिल कपूर खूपच आनंदित झाले आहेत. अनिल कपूर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर टॉम क्रूझचा ऑस्कर स्वीकारतानाचा एक फोटो शेअर केला.
या फोटोसोबत अनिल कपूर यांनी लिहिले: "माझ्या प्रिय मित्रा, या शानदार सन्मानासाठी खूप खूप अभिनंदन. तुझी जिद्द, मेहनत आणि तुझा प्रेमळ स्वभाव याला तोड नाही. जगभरातील लोकांनी तुला पसंत केले आहे आणि आता तुला अधिकृतपणे ऑस्कर सन्मान मिळाला आहे. हा सन्मान मिळवण्यासाठी खऱ्या अर्थाने तू पात्र आहेस. अनेक कारणांनी तुला खूप खूप धन्यवाद"
या चित्रपटात केले आहे सोबत काम
अनिल कपूर आणि टॉम क्रूझ यांनी २०११ मध्ये आलेल्या सुपरहिट हॉलिवूड चित्रपट 'मिशन इम्पॉसिबल: घोस्ट प्रोटोकॉल' मध्ये एकत्र काम केले होते. हा चित्रपट 'मिशन इम्पॉसिबल' मालिकेतील चौथा भाग होता. या ॲक्शन-स्पाय चित्रपटात टॉम क्रूझ 'एथन हंट'च्या भूमिकेत होता.
ऑस्कर मिळाल्यावर भावूक झाले टॉम क्रूझ
हा खास पुरस्कार स्वीकारताना टॉम क्रूझ खूप भावूक झाला. त्याने आपल्या भाषणात म्हटले, "चित्रपट मला जगभर फिरवतात. ते मला वेगवेगळ्या संस्कृतींचा आदर करायला आणि आपल्या माणुसकीला समजून घ्यायला शिकवतात. थिएटरच्या अंधारात आपण सर्वजण एकत्र हसतो, एकत्र रडतो, एकत्र आशा बाळगतो आणि हीच सिनेमाची खरी शक्ती आहे. माझ्यासाठी चित्रपट बनवणे हे फक्त काम नाही, तर ते माझे आयुष्य आहे."
या सोहळ्याला जेनिफर लॉरेन्स, लिओनार्डो डिकॅप्रियो, ड्वेन जॉन्सन, एम्मा स्टोन, मायकल बी. जॉर्डन, सिडनी स्वीनी यांसारख्या अनेक मोठ्या हॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. टॉम क्रूझ यांना मिळालेल्या या पुरस्काराने त्यांचे चाहते आणि सहकलाकार खूपच आनंदी झाले आहेत.