'The Roshans'चा ट्रेलर पाहिलात का? हृतिकच्या कुटुंबाची गुपितं उलगडणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:22 IST2025-01-10T16:21:22+5:302025-01-10T16:22:23+5:30
'द रोशन्स' (The Roshans) ही बहुप्रतिक्षित डॉक्यु-सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

'The Roshans'चा ट्रेलर पाहिलात का? हृतिकच्या कुटुंबाची गुपितं उलगडणार
The Roshans Trailer: बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही प्रतिष्ठित घराणी आहेत, ज्यांनी अनेक पिढ्यांचं मनोरंजन केलंय. या कुटुंबातील अनेकजण या मनोरंजनाच्या जगात अविरत काम करत आले आहेत. त्यापैकीच एक आहे हृतिक रोशनचं (Hrithik Roshan) कुटुंब. रोशन कुटुंबातील काहींनी निर्मिती क्षेत्र निवडले, काहींनी दिग्दर्शन तर काहींनी संगीतक्षेत्र तर काहींनी अभिनय. रोशन कुटुंबाबद्दल चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असते. आता या रोशन कुटुंबाच्या कारकिर्दीचा मागोवा घेणारी 'द रोशन्स' (The Roshans) ही बहुप्रतिक्षित डॉक्यु-सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
'द रोशन्स' (The Roshans) या डॉक्यु-सीरिजमधून चाहत्यांना रोशन कुटुंबाबद्दल बरेच काही जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये तीन पिढ्यांचा इतिहास दाखवला आहे. या कुटुंबाचं आडनाव नागरथवरून रोशन कसे झाले (How Hrithik's Surname Went From Nagrath To Rosha), हेदेखील जाणून घेता येणार आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला हृतिक रोशन हा आजोबा रोशनलाल नागरथ यांनी संगीतबद्ध केलेले गाणे कॅसेटवर वाजवतना दिसतोय. तर पुढे आशा भोसले (Asha Bhosle) म्हणतात, 'सर्व कलाकार एकाच घरात जन्माला येतात, असं सहसा घडत नाही. पण रोशनजींच्या घरात हे घडलं आहे". ट्रेलरमध्ये आशा भोसले यांच्या पासून संजय लीला भन्साळी, शाहरुख खान, अनिल कपूर, शत्रुघ्न सिन्हा, रणबीर कपूर, प्रियंका चोप्रा, सोनू निगम, अनु मलिक, प्रेम चोप्रा, सलीम मर्चंट आणि विकी कौशल असे अनेक सेलिब्रिटी रोशन कुटुंबाबद्दल बोलताना पाहायला मिळत आहे.
राकेश रोशन आणि हृतिक रोशन ही बाप-लेकाची जोडी तर लोकप्रिय आहे. हृतिक रोशन एक उत्तम अभिनेता आहे. त्यांचे वडील राकेश रोशन (Rakesh Roshan) हे निर्माता, दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि अभिनेते आहेत. तर काका राजेश रोशन (Rajesh Roshan) हे संगीत दिग्दर्शक आणि संगीतकार आहेत. हृतिकचे आजोबा रोशन लाल नागरथ हे देखील संगीत दिग्दर्शक होते.
'द रोशन्स' प्रदर्शनासाठी सज्ज झाली असून १७ जानेवारी रोजी Netflix वर स्ट्रीम होणार आहे. घरबसल्या तुम्ही ही डॉक्यु-सिरीज आरामात पाहू शकता. आजकाल सेलिब्रिटींच्या जीवनावर डॉक्यु-सिरीज बनवण्याचा ट्रेंड आहे. काही महिन्यांपूर्वी सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्यावरील एक डॉक्यु-सिरीज प्रदर्शित झाली होती. त्यानंतर रॅपर आणि गायक यो यो हनी सिंगने त्याच्या आयुष्यावर एक डॉक्यु-सिरीज आणली. आता रोशन कुटुंबावरील या सिरीजबद्दल चाहत्यांनामध्ये मोठी उत्सुकता आहे.