'द केरळ स्टोरी २' प्रोपगंडा म्हणणाऱ्यांना निर्मात्यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले, "वाईट प्रवृत्तीच्या विरोधात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 10:29 IST2026-02-24T10:26:15+5:302026-02-24T10:29:45+5:30
'द केरळ स्टोरी २' या चित्रपटाला 'प्रोपगंडा' संबोधले जात असतानाच निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी आपली भूमिका स्पष्ट करत टीकाकारांना उत्तर दिले आहे.

'द केरळ स्टोरी २' प्रोपगंडा म्हणणाऱ्यांना निर्मात्यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले, "वाईट प्रवृत्तीच्या विरोधात..."
'तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटाने देशात वादंग निर्माण झाला होता. प्रेमाचे प्रलोभन दाखवून हिंदू तरुणींना मुस्लीम तरुणांकडून लक्ष्य केले जात असल्याचे या चित्रपटाच्या कथेतून दाखवण्यात आले होते. अंगावर शहारे आणणाऱ्या या कथेला त्यावेळी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यादरम्यान चित्रपटाचा दुसरा भाग ‘द केरला स्टोरी २’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वीच त्याच्या कथेवरून पुन्हा एकदा राजकीय वादंग निर्माण झाला आहे. या चित्रपटाला 'प्रोपगंडा' संबोधले जात असतानाच निर्माते विपुल अमृतलाल शाह यांनी आपली भूमिका स्पष्ट करत टीकाकारांना उत्तर दिले आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरवर चित्रपट निर्माते, राजकीय नेते आणि सामाजिक गटांनी घेतलेल्या आक्षेपानंतर विपुल शाह यांनी स्पष्ट केले की, हा चित्रपट केरळ राज्य किंवा तिथल्या लोकांच्या विरोधात नाही. ते म्हणाले, "केरळ हा 'देवाचा स्वतःचा देश' आहे. आम्ही केरळच्या विरोधात नाही. हा चित्रपट केवळ त्या राज्यात मूळ धरत असलेल्या वाईट प्रवृत्तीला अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला वाटते की या वाईट गोष्ट त्या राज्यातून लवकरात लवकर नष्ट व्हायला हव्यात".
'प्रोपगंडा' म्हणणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
चित्रपटाला प्रोपगंडा म्हणणाऱ्यांबद्दल बोलताना शाह पुढे म्हणाले, "जर तुमच्या घरात अशी कोणती घटना घडत नसेल, तर साहजिकच तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. २०१४ मध्ये जेव्हा मी या विषयावर पहिल्यांदा बोललो होतो, तेव्हा अनेकांनी मला खोटारडे म्हटले होते. पण आज सत्य सर्वांसमोर आहे".
काय आहे चित्रपटाचा विषय?
'द केरळ स्टोरी २' या चित्रपटात उल्का गुप्ता, अदिती भाटिया आणि ऐश्वर्या ओझा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या तिघीही तीन मुस्लिम तरुणांच्या प्रेमात पडतात आणि त्यानंतर त्यांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होते, याचे चित्रण यात आहे