सुनील ग्रोव्हरने केली आमिर खानची हुबेहुब नक्कल; अभिनेत्याच्या लग्नाची उडवली खिल्ली, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:13 IST2025-12-30T13:11:26+5:302025-12-30T13:13:37+5:30
सुनील ग्रोव्हरने मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची परफेक्ट नक्कल केली आहे. व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही

सुनील ग्रोव्हरने केली आमिर खानची हुबेहुब नक्कल; अभिनेत्याच्या लग्नाची उडवली खिल्ली, व्हिडीओ व्हायरल
प्रसिद्ध कॉमेडियन सुनील ग्रोवर (Sunil Grover) आपल्या अष्टपैलू अभिनयासाठी आणि मिमिक्रीसाठी ओळखला जातो. नेटफ्लिक्सवरील 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या नुकत्याच झालेल्या भागात सुनील ग्रोवरने बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानचा लूक आणि अंदाज इतक्या अचूकपणे साकारला की, सोशल मीडियावर नेटकरी त्याला 'AI पेक्षाही भारी' म्हणत आहेत. याशिवाय आमिरच्या लग्नावरही टोला लगावला आहे.
'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या नवीन भागात कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे त्यांच्या आगामी 'तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. तेव्हा अचानक आमिर खानच्या लूकमध्ये सुनील ग्रोवरने एन्ट्री घेतली. लाल रंगाची पॅन्ट, प्रिंटेड कुर्ता, चष्मा आणि डोक्यावर हेअरबँड अशा आमिरच्या प्रसिद्ध लूकमुळे कार्तिक आणि अनन्याही काही क्षण गोंधळले. सुनीलचे हावभाव आणि बोलण्याची पद्धत पाहून प्रेक्षकांनाही हसू आवरले नाही.
आमिर खानच्या गेटअपमध्ये असलेल्या सुनीलने कार्तिक आर्यनशी गप्पा मारताना आमिरच्या खास शैलीत प्रश्न विचारले. त्याने कार्तिकला त्याच्या लग्नाबद्दल विचारले, ज्यावर कपिलने "अजून त्याचं लग्न नाही झालं" असं उत्तर दिलं. तेव्हा सुनीलने आमिरचाच आवाज काढून विचारलं, "अजून एकही लग्न नाही झाले?" या एका संवादाने संपूर्ण सेटवर हशा पिकवला. अशाप्रकारे सुनीलने आमिरच्या दोन लग्नांची खिल्ली उडवली. याशिवाय त्याने कार्तिक-अनन्याच्या 'तू मेरी मैं तेरा, मैं तेरा तू मेरी' चित्रपटाच्या लांबलचक नावावरही मिश्किल टिप्पणी केली.
या नव्या एपिसोडचा प्रोमो व्हायरल होताच प्रेक्षकांनी सुनील ग्रोवरच्या टॅलेंटचे तोंडभरून कौतुक केले आहे. अनेक युजर्सनी कमेंट्समध्ये म्हटले आहे की, "पहिल्या नजरेत मला खरेच आमिर खान आल्यासारखे वाटले." काहींनी त्याला तो कोणत्याही भूमिकेत सहज मिसळतो, असे मत व्यक्त केले आहे. कार्तिक आणि अनन्याचा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला असून, त्याने पहिल्या चार दिवसांत चांगली कमाई केली आहे.