मुस्लिम की हिंदू... मुलीचं कोणत्या धर्मानुसार संगोपन करतेय स्वरा भास्कर, अभिनेत्री म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 13:11 IST2025-03-17T13:10:57+5:302025-03-17T13:11:58+5:30
स्वराच्या मुलीचं नाव राबिया रमा असं आहे.

मुस्लिम की हिंदू... मुलीचं कोणत्या धर्मानुसार संगोपन करतेय स्वरा भास्कर, अभिनेत्री म्हणाली...
अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा पडद्यावर आणि वैयक्तिक आयुषातील बिनधास्त आणि बेधडक स्वभाव प्रेक्षकांनी अनुभवला आहे. आपल्याला वाटेल ते करणारी, मनात येईल तसे बिनधास्त वागणारी, रोखठोक बोलणारी स्वरा कायम चर्चेत असते. कधीकधी तिला यामुळे ट्रोल देखील केलं जातं. स्वराने २०२३ मध्ये मुस्लिम राजकारणी फहाद अहमदशी लग्न केलं आणि त्याच वर्षी तिनं मुलीला जन्मही दिला. स्वराच्या मुलीचं नाव राबिया रमा असं आहे. अशातच आता स्वराने एका मुलाखतीमध्ये आंतरधर्मीय विवाह, मातृत्व आणि धार्मिक परंपरा यावर मोकळेपणाने भाष्य केलं.
स्वराने नुकतंच स्क्रीनच्या सुवीर सरन शोमध्ये विविध विषयांवर खुलासे केले. यावेळी आपल्या लेकीचं सर्व धर्मांच्या रीतिरिवाजांनुसार संगोपन करत असल्याचं तिनं सांगितलं. ती म्हणाली, "मला कोणत्याही गोष्टीवर अविश्वास दाखवत नाही. आता जेव्हा आम्हाला मुलगी झाली, तेव्हा मी फहादला म्हटलं की आपण सर्व धर्म आणि संस्कृतींचे विधी करुयात. मग ते हिंदू,मुस्लिम, शीख असो वा ख्रिश्चन. जेणेकरून ती सुरक्षित राहील".
स्वरा म्हणाली, "मी लहान असताना जेवण करत नसे, म्हणून माझे वडील मला रामायण आणि महाभारतातील गोष्टी सांगायचे. ते मला माझ्या ताटामधील सर्व काही संपवायला सांगायचे आणि नंतर कथेचा शेवट सांगायचे. मुलांना संस्कृतीची ओळख करून देण्याचा हा एक सुंदर आणि सोपा मार्ग आहे". स्वरा पुढे म्हणाली, "जेव्हा माझ्या राबिया रमाला खोकला येतो किंवा अस्वस्थ वाटतं, तेव्हा मी फहादला प्रार्थना करायला सांगते".