सुपरस्टार रामचरणच्या घरी चिमुकलीचं आगमन, 'मेगा प्रिन्सेस' म्हणत चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 09:08 IST2023-06-20T09:06:40+5:302023-06-20T09:08:09+5:30

लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाल्यानंतर रामचरण बाबा झाला आहे.

superstar ramcharan blessed with a baby girl after 10 years of marriage with upasana | सुपरस्टार रामचरणच्या घरी चिमुकलीचं आगमन, 'मेगा प्रिन्सेस' म्हणत चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

सुपरस्टार रामचरणच्या घरी चिमुकलीचं आगमन, 'मेगा प्रिन्सेस' म्हणत चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

सुपरस्टार रामचरण (Ramcharan) आणि पत्नी उपासना (Upasana) लग्नाच्या १० वर्षांनंतर आई बाबा झाले आहेत. उपासनाने आज एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. यामुळे रामचरण आणि कुटुंबीय यांच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. हैद्राबाद येथील अपोलो रुग्णालयात उपासनाने मुलीला जन्म दिला. काही महिन्यांपूर्वीच RRR स्टार रामचरणने बाबा होणार असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.

लग्नाच्या १० वर्षांनंतर पाळणा हलला

साऊथ मेगास्टार रामचरण आणि उपासना 14 जून 2012 रोजी विवाहबंधनात अडकले. रामचरणला मुलगी झाल्याची बातमी त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहोचली. चाहत्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत व्हायरल केली. अपोलो रुग्णालायाचं मेडिकल बुलेटिन व्हायरल होत आहे. मुलगी आणि आई दोघीही स्वस्थ असल्याचं त्यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.

रामचरण आणि उपासना यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये रामचरण आणि उपासना अपोलो रुग्णालयात पोहोचल्याचं दिसत आहे. काल रात्रीच दोघंही डिलिव्हरीसाठी रुग्णालयाच दाखल झाले. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसून येतोय आणि ते आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी उत्सुक आहेत.



या वर्षाच्या सुरुवातीलाच रामचरणचे वडील आणि साऊथ मेगास्टार चिरंजीवी (Chiranjeevi) यांनी सूनेच्या प्रेग्नंसीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यांनी ट्वीट करत हनुमानाचे आभार मानले होते आणि बाळाच्या आगमनासाठी उत्सुक असल्याचे सांगितले होते. तर दुसरीकडे रामचरणच्या करिअरमध्येही भरभराट झाली आहे. त्याच्या RRR सिनेमातील गाण्याला थेट ऑस्कर पुरस्कार मिळाला. ऑस्कर सोहळ्यात संपूर्ण RRR ची टीम सामील झाली होती.

रामचरण आणि उपासनाच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली आहेत. पाच दिवसांपूर्वीच त्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा केला. तर आता त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण आला आहे कारण ते एका गोंडस चिमुकलीचे आगमन झाले आहे. रामचरणचे चाहते या चिमुकलीला 'मेगा प्रिन्सेस' असं संबोधत आहेत.

Web Title: superstar ramcharan blessed with a baby girl after 10 years of marriage with upasana