पुण्यात ट्रेनिंग, ५ किलो वजन कमी केलं अन्...; सुनील शेट्टीच्या लेकाची 'बॉर्डर २'साठी मोठी मेहनत, सांगितला अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:32 IST2025-12-24T16:15:01+5:302025-12-24T16:32:58+5:30
सुनील शेट्टीचा लेक अहानने बॉर्डर २ साठी मोठी मेहनत घेतली आहे. त्याने फार कमी दिवसांमध्ये ५ किलो वजन कमी केलं आहे.

पुण्यात ट्रेनिंग, ५ किलो वजन कमी केलं अन्...; सुनील शेट्टीच्या लेकाची 'बॉर्डर २'साठी मोठी मेहनत, सांगितला अनुभव
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी सध्या आपल्या आगामी 'बॉर्डर २' (Border 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. १९९७ मध्ये आलेल्या ऐतिहासिक 'बॉर्डर' चित्रपटाच्या या सिक्वेलमध्ये अहान एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील आपल्या सैनिकाच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी अहानने जोरदार तयारी केली असून त्याने अवघ्या काही दिवसांत ५ किलो वजन घटवले आहे.
सैनिकाच्या लूकसाठी विशेष मेहनत
'बॉर्डर २'मध्ये अहानला एका फिट आणि रांगड्या सैनिकाच्या रूपात दिसायचे आहे. यासाठी त्याने आपल्या डाएट आणि वर्कआउटमध्ये मोठे बदल केले आहेत. अहानने केवळ वजनच कमी केले नाही, तर आपल्या शरीरयष्टीवरही काम केले आहे. चरबी कमी करण्यासाठी विशिष्ट असे पदार्थ खाऊन अहानने स्वतःला फिट ठेवलं. विशेषतः पुण्यातील नॅशनल डिफेंस अकॅडमीमध्ये अहानने यासाठी विशेष ट्रेनिंग घेतलं.
अशाप्रकारे पडद्यावर एक खराखुरा भारतीय जवान दिसावा म्हणून अहानने शारीरिक बदल केले आहेत. 'बॉर्डर २'साठी अहानने स्वतःलाही कडक शिस्त लावली. शूटिंंगदरम्यान त्याने कधीही डाएटला सुट्टी दिली नाही. याशिवाय एकदाही 'चीट मिल डे' केला नाही. स्वतःचं डाएट आणि व्यायाम व्यवस्थित पाळून अहानने फार कमी दिवसांमध्ये ५ किलो वजन कमी केलं.
विशेष म्हणजे, मूळ 'बॉर्डर' चित्रपटात सुनील शेट्टी यांनी साकारलेली 'भैरव सिंग' यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता अहान त्याच फ्रँचायझीचा भाग बनल्यामुळे शेट्टी कुटुंबासाठी हा एक भावनिक क्षण आहे. वडिलांनी जो वारसा निर्माण केला, तो पुढे नेण्यासाठी अहान कठोर मेहनत घेतोय.
'बॉर्डर २'चे दिग्दर्शन अनुराग सिंग करत असून भूषण कुमार आणि जे.पी. दत्ता या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटात सनी देओल पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार असून त्याच्यासोबत वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. अहान शेट्टीने 'तडप' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते आणि आता 'बॉर्डर २' त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट ठरू शकतो. हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.