रोहित शर्मा अन् विराट कोहलीवर टीका करणाऱ्या सुनील शेट्टीनं सुनावलं, म्हणाला "खेळाचा आदर करा"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 13:01 IST2025-10-26T12:47:31+5:302025-10-26T13:01:23+5:30
रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल अभिनेत्यानं एक महत्त्वपूर्ण पोस्ट शेअर केली आहे.

रोहित शर्मा अन् विराट कोहलीवर टीका करणाऱ्या सुनील शेट्टीनं सुनावलं, म्हणाला "खेळाचा आदर करा"
भारतीय क्रिकेट संघातील दोन दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना त्यांच्या अलीकडील फॉर्ममुळे सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेला बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) याने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात या दोन्ही खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला. मात्र त्यापूर्वी त्यांना प्रचंड ऑनलाइन ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.
शनिवारी (२५ ऑक्टोबर) सुनील शेट्टी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक महत्त्वपूर्ण पोस्ट शेअर करत विराट आणि रोहितच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली. त्यांनी अधोरेखित केलं, क्रिकेटपटूंचे यश आणि त्यांचे योगदान लोक किती लवकर विसरतात. "आपण रेकॉर्ड्स, भांडणे, अभिमान, अश्रू, बलिदान किती लवकर विसरतो हे विचित्र आहे", असे अभिनेत्यानं आपल्या पोस्टमध्ये लिहिले.
फक्त दोन-तीन सामन्यांनंतर लोकांच्या मतांमध्ये होणाऱ्या तीव्र बदलावर अभिनेत्यानं लक्ष वेधले. पुढे म्हटलं, "दोन सामने आणि अचानक सर्वजण टीकाकार बनले. त्यांनी आवाज ऐकला. त्यांच्यावर शंका घेण्यात आली, ते गप्प राहिले आणि त्यांच्या बॅटने प्रतिसाद दिला. कारण रोहित आणि विराटसारख्या दिग्गजांना काहीही सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. खेळाचा आदर करा". शेट्टीच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत समर्थन केले आहे.
सिडनीमध्ये 'किंग' कोहली आणि 'हिटमॅन' रोहितचा धमाका
यापूर्वीच्या काही सामन्यांमध्ये कोहली लवकर बाद झाल्यामुळे मीम्सचा पाऊस पडला होता, तर कमी धावा केल्याबद्दल रोहित शर्माला टीकेला सामोरे जावे लागले होते. या सर्व टीकेला दोघांनीही सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आपल्या बॅटने उत्तर दिले. रोहित शर्मा याने शानदार फलंदाजी करत नाबाद १२१ धावा ठोकल्या, जे त्याचे ३३ वे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक होते. विराट कोहली यानेही त्याला चांगली साथ देत ७४ धावांवर नाबाद राहिला. या दोघांनी मिळून १६८ धावांची अखंड भागीदारी रचत भारताला विजयाकडे नेलं.