एकेकाळी गोविंदासोबत व्हायची 'या' अभिनेत्याची तुलना, आता आहे इंडस्ट्रीपासून दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 10:22 IST2026-02-18T10:21:58+5:302026-02-18T10:22:41+5:30
Bollywood actor:एकेकाळी इंडस्ट्रीत लोकप्रियता मिळवलेला हा कलाकार आज कलाविश्वापासून दूर झाला आहे.

एकेकाळी गोविंदासोबत व्हायची 'या' अभिनेत्याची तुलना, आता आहे इंडस्ट्रीपासून दूर
कलाविश्वात बऱ्याच कलाकारांची एकमेकांसोबत तुलना केली जाते. यात खासकरुन एखाद्या नवोदित किंवा ज्युनिअर कलाकाराची तर हमखास लोकप्रिय अभिनेत्यासोबत तुलना होते. बॉलिवूडमध्ये असाच एक कलाकार होता ज्याची तुलना कायम गोविंदासोबत केली जायची. विशेष म्हणजे एकेकाळी इंडस्ट्रीत लोकप्रियता मिळवलेला हा कलाकार आज कलाविश्वापासून दूर झाला आहे.
८० ते ९० चा काळ गाजवणारा हा लोकप्रिय अभिनेता म्हणजे सुमीत सहगल. इंसानियत के दुश्मन या सिनेमातून सुमीत यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुमीत यांचा लूक बऱ्यापैकी गोविंदाशी मिळताजुळता होता. त्यामुळे लोक त्याची तुलना गोविंदाशी करायचे. परंतु, पर्सनालिटीच्या जोरावर चर्चेत आलेल्या सुमीतचा अभिनय प्रेक्षकांना फारसं आवडला नाही. त्यामुळे प्रसिद्धी मिळूनही त्याला म्हणावं तसं यश मिळालं नाही.
सुमीत यांनी त्यांच्या करिअरमध्ये जवळपास ३० सिनेमांमध्ये काम केलं. यात त्यांनी संजय दत्त, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, मिथुन चक्रवर्ती, ऋषी कपूर यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केली. १९८७ पासून ते १९९५ पर्यंत ते इंडस्ट्रीत सक्रीय होते. मात्र, त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमधून काढता पाय घेतला.
प्रोफेशन लाइफसोबतच सुमीत त्यांच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत आले. त्यांनी अभिनेत्री शाहीन हिच्यासोबत १९९० मध्ये लग्नगाठ बांधली. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. २००३ मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री फराह नाज (अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण) हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. विशेष म्हणजे फराहचंदेखील हे दुसरं लग्न होतं. सुमीतपूर्वी तिने अभिनेता विंदू दारासिंह यांच्यासोबत लग्न केलं होतं. मात्र, त्यांचाही घटस्फोट झाला. सध्या सुमीत आणि फराह यांनी कलाविश्वापासून फारकत घेतली असून ते इंडस्ट्रीपासून दूर आहेत.