'रामायण'मध्ये यश साकारणार रावण! सुरु केलं शूट; फिल्मसिटीत उभारली रावणाची लंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 12:04 IST2025-05-01T12:03:37+5:302025-05-01T12:04:26+5:30
यशला रावणाच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक

'रामायण'मध्ये यश साकारणार रावण! सुरु केलं शूट; फिल्मसिटीत उभारली रावणाची लंका
नितेश तिवारींच्या 'रामायण' (Ramayan) सिनेमाची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्रीराम तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. दोघंही काही महिन्यांपासून सिनेमाचं शूट करत आहेत. दरम्यान सिनेमात साऊथ सुपरस्टार यश (Yash) रावणाची भूमिका साकारणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार त्याने सिनेमाच्या शूटिंगला सुरुवातही केली आहे. मुंबईतील फिल्मसिटीत रावणाचा दरबार उभारण्यात आला आहे.
'रामायण' सिनेमात यश रावणाच्या भूमिकेत दिसणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. शूटिंग सुरु करण्यापूर्वी यशने उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. 'पिंकव्हिला'ने दिलेल्या माहितीनुसार, यशने मुंबईत शूटिंगला सुरुवात केली आहे. तो पुढील एक महिना मुंबईतच राहणार आहे. यादरम्यान सिनेमाचा महत्वाचा भाग शूट होणार आहे. फिल्म सिटीमध्ये सिनेमाचं शूट सुरु असून भव्य सेट उभारण्यात आले आहेत. रावणाची लंका फिल्मसिटीत सजलेली आहे.
यशच्या एन्ट्रीने चाहत्यांमध्येही सिनेमाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. सिनेमात अभिनेता सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. अद्याप सनीने शूट सुरु केलेलं नाही मात्र काही दिवसांपूर्वीच त्याने आपल्या भूमिकेवर भाष्य केलं होतं. हा सर्वात मोठा सिनेमा बनेल अशी त्याने प्रतिक्रिया दिली होती.
'रामायण' सिनेमा दोन भागांमध्ये बनणार आहे. पहिला भाग पुढील वर्षी २०२६ मध्ये रिलीज होईल अशी शक्यता आहे. सिनेमात लारा दत्ता कैकयी आहे तर रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत आहे. अजिंक्य देव, आदिनाथ कोठारेसह आणखी काही कलाकारांचीही भूमिका आहे.