रणबीरच्या 'रामायण'मध्ये साउथ अभिनेत्रीची एन्ट्री? दिसणार रावणाची आई कैकसीच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:33 IST2025-01-28T13:32:53+5:302025-01-28T13:33:47+5:30
Ramayan Movie : अभिनेता रणबीर कपूरचा आगामी बहुचर्चित चित्रपट रामायणबाबत सातत्याने सतत नवनवीन अपडेट समोर येत आहे.

रणबीरच्या 'रामायण'मध्ये साउथ अभिनेत्रीची एन्ट्री? दिसणार रावणाची आई कैकसीच्या भूमिकेत
अभिनेता रणबीर कपूरचा आगामी बहुचर्चित चित्रपट रामायणबाबत सातत्याने सतत नवनवीन अपडेट समोर येत आहे. रामायण या चित्रपटात रणबीर कपूर प्रभु रामच्या भूमिकेत तर साई पल्लवी सीता मातेच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटातील रावणाची आई कैकसीच्या भूमिकेवरून पडदा उचलण्यात आला आहे. कैकसीच्या भूमिकेत साऊथची अभिनेत्री दिसणार आहे. ही अभिनेत्री कोण असेल हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण सिनेमा संदर्भात काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हा चित्रपट दोन भागात बनवला जाणार आहे, ज्याची घोषणा आधीच झाली आहे. रणबीर कपूर आणि साई पल्लवी या चित्रपटात प्रभू राम आणि सीता मातेच्या प्रतिष्ठित भूमिकेत दिसणार आहेत. आता कैकसीच्या पात्रावरून पडदा उचलण्यात आला आहे.
पद्मभूषण पुरस्कार विजेती दाक्षिणात्य अभिनेत्री शोभना हिला रावणाची आई कैकसी म्हणून कास्ट करण्यात आल्याचे समजते आहे. कल्की 2898 AD मध्ये तिने आपल्या अभिनयातून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. शोभना आता रामायणात कैकसीची महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. कैकसीच्या भूमिकेला ती न्याय देईल का, हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. रामायण चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये प्रदर्शित होईल आणि दुसरा भाग दिवाळी २०२७ ला प्रदर्शित होईल. प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
कोण आहे शोभना?
शोभनाचे पूर्ण नाव शोभना चंद्रकुमार पिल्लई आहे. तिचा जन्म १९७० मध्ये केरळमध्ये झाला. अभिनेत्री असण्यासोबतच ती भरतनाट्यम नृत्यांगना देखील आहे. तिने मल्याळम, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. शोभनाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. आता २०२५ मध्ये भारत सरकारने तिला पद्मभूषण देऊन सन्मानित केले आहे. शोभनाने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. तिने मेगा स्टार चिरंजीवी आणि मोहन बाबूसोबत काम केले आहे.