धर्मेंद्र यांचे हे प्रसिद्ध गाणे चित्रीत करण्यात येणार नातू करण देओलवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 15:46 IST2019-03-26T15:44:57+5:302019-03-26T15:46:19+5:30
पल पल दिल के पास हे गाणे ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येतात ते अभिनेते धर्मेंद्र आणि राखी. ब्लॅकमेल या 1973 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले हे गाणे आजही प्रचंड लोकप्रिय आहे.

धर्मेंद्र यांचे हे प्रसिद्ध गाणे चित्रीत करण्यात येणार नातू करण देओलवर
बॉलिवूडच्या देओल कुटुंबाने इंडस्ट्रीला धर्मेन्द्र देओल, सनी देओल, बॉबी देओल, अभय देओल असे दिग्गज स्टार्स दिलेत. या सगळ्यांनी दीर्घकाळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. आता या कुटुंबातून आणखी एक नवा चेहरा इंडस्ट्रीत येत आहे... तो म्हणजे, सनी देओलचा मोठा मुलगा करण देओल. ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून करण बॉलिवूड डेब्यू करणार आहे.
पल पल दिल के पास हे गाणे ऐकल्यावर आपल्या डोळ्यांसमोर येतात ते अभिनेते धर्मेंद्र आणि राखी. ब्लॅकमेल या 1973 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले हे गाणे आजही प्रचंड लोकप्रिय आहे. हेच गाणे पुन्हा एकदा प्रेक्षकांना एका नव्या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट दुसरा कोणाचाही नसून धर्मेंद्र यांचा नातू करण देओलचा आहे आणि धर्मेंद्र यांचे हे प्रसिद्ध गाणे त्यांच्याच नातवावर चित्रीत करण्यात येणार आहे.
पल पल दिल के पास या प्रसिद्ध गाण्यावरूनच करणच्या पहिल्या चित्रपटाचे नाव ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन करणचे वडील अभिनेते सनी देओलच करत आहेत. या चित्रपटात प्रेक्षकांना एक खूप छान प्रेमकथा पाहायला मिळणार असून या चित्रपटाचे अधिकाधिक चित्रीकरण हे मनाली, दिल्ली येथे झाले आहे. १८ मे २०१७ रोजी या चित्रपटाचे शूटींग सुरू झाले होते आणि सध्या या चित्रपटाच्या शेवटच्या शेड्युलचे चित्रीकरण मुंबईत सुरू आहे. काहीच दिवसांत या चित्रपटाचे चित्रीकरण संपेल असे म्हटले जात आहे. मनालीमध्ये तर शून्य तापमानात या चित्रपटाच्या टीमने चित्रीकरण केले आहे. त्या वातावरणात चित्रीकरण करणे हा संपूर्ण टीमसाठीच एक वेगळा अनुभव होता.
पल पल दिल के पास हा चित्रपट 19 जुलैला प्रदर्शित होणार असून या चित्रपटात करणसोबत साहर बम्बा ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत झळकणार आहे. साहर ही मुळची सिमलाची असून तिचा हा पहिलाच चित्रपट आहे.