"त्याला ऑस्कर देऊन टाका!" स्मृती इराणीही झाल्या अक्षय खन्नाच्या फॅन; 'धुरंधर' पाहून केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 09:23 IST2025-12-16T09:20:23+5:302025-12-16T09:23:42+5:30
अक्षय खन्नाचा अभिनय पाहून स्मृती इराणी त्याच्या चाहत्या झाल्या आहेत. त्यांनी अभिनेत्याला ऑस्कर देण्याची मागणी केली आहे

"त्याला ऑस्कर देऊन टाका!" स्मृती इराणीही झाल्या अक्षय खन्नाच्या फॅन; 'धुरंधर' पाहून केलं कौतुक
रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेल्या 'धुरंधर' (Dhurandhar) चित्रपटाची चर्चा दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपट पाहणारा प्रत्येक प्रेक्षक रणवीर सिंह आणि अक्षय खन्नाच्या (Akshaye Khanna) अभिनयाचे कौतुक करताना थकत नाहीये. काही दिवसांपूर्वी दिग्दर्शिका फराह खानने अक्षय खन्नाला 'ऑस्कर' देण्याची मागणी केली होती आणि आता भाजप नेत्या आणि अभिनेत्री स्मृती इराणी यांनीही खास पोस्ट लिहून अक्षयचं कौतुक केलं आहे.
स्मृती इराणी झाल्या अक्षय खन्नाच्या फॅन
स्मृती इराणी यांनी 'धुरंधर' चित्रपट पाहिल्यानंतर अक्षय खन्नाच्या अभिनयाचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्यांनी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर गेल्या आठवड्यातही दिग्दर्शक आदित्य धर आणि सर्व कलाकारांचे कौतुक करत चित्रपटाचा रिव्ह्यू शेअर केला होता. आता त्यांनी आणखी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यांनी थेट अक्षय खन्नाला ऑस्कर देण्याची मागणी केली.
स्मृती इराणी यांनी 'तीस मार खान' चित्रपटातील अक्षय खन्नाची एक व्हायरल क्लिप शेअर केली आहे. या क्लिपसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, “जेव्हा अक्षय खन्नाने सगळ्यांच्या अपेक्षा ओलांडून भन्नाट काम केलं, तेव्हा तुम्हालाही मोठ्याने ओरडून सांगावंसं वाटेल... त्याला ऑस्कर देऊन टाका.” एकूणच सर्वजण अक्षय खन्नाचे फॅन झाले असून त्याला ऑस्कर देण्याची मागणी करत आहेत.
फराह खाननेही केली होती मागणी
स्मृती इराणी यांच्यापूर्वी फराह खाननेही एक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते, "अक्षय खन्ना खरोखर ऑस्करला पात्र आहे." फराहने इन्स्टाग्रामवर 'तीस मार खान'मधील दोन दृश्ये दाखवली होती, ज्यातील एका दृश्यात अक्षय कुमार अक्षय खन्नाकडे निर्देश करत म्हणतो- "तो आहे माझा सुपरस्टार, माझा ऑस्कर." याच पोस्टवर प्रतिक्रिया देताना फराह खानने अक्षय खन्ना खऱ्या अर्थाने ऑस्करचा दावेदार असल्याचे म्हटले होते.
अशाप्रकारे 'धुरंधर' सिनेमातील अक्षयचं खूप कौतुक होतंय. या सिनेमात रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना व्यतिरिक्त अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, संजय दत्त आणि आर माधवन यांसारख्या कलाकारांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या दिग्दर्शनाने चित्रपटाला एक खास ओळख दिली आहे. सामान्य प्रेक्षकांसोबतच अनेक मोठे सेलिब्रिटीही या चित्रपटाचे कौतुक करत असल्याने 'धुरंधर'ची चर्चा अधिकच वाढली आहे.