अभिनयासाठी घर सोडलं, फूटपाथवर झोपून काढले दिवस, प्रसिद्ध अभिनेत्याचं कठीण काळावर भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 17:47 IST2025-04-18T17:38:31+5:302025-04-18T17:47:35+5:30
'सिंघम' फेम अभिनेते अशोक समर्थ यांचं कठीण काळावर भाष्य, काय म्हणाले?

अभिनयासाठी घर सोडलं, फूटपाथवर झोपून काढले दिवस, प्रसिद्ध अभिनेत्याचं कठीण काळावर भाष्य
Ashok Samarth: पिळदार शरीर आणि दमदार अभिनय ही अभिनेता अशोक समर्थ यांची खासियत आहे. मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. 'सिंघम', 'रावरंभा', 'रावडी राठोड' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. परंतु त्यांचा या क्षेत्रातील प्रवास फार काही सोपा नव्हता. असंख्य अडचणींवर मात करत त्यांनी इंडस्ट्रीत हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अशोक समर्थ यांनी त्यांच्या संघर्ष काळावर भाष्य केलं आहे.
नुकतीच अभिनेते अशोक समर्थ यांनी 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये आपल्या अभिनय प्रवासाबद्दल सांगताना ते म्हणाले, "माझ्या आतला जो हुंकार होता त्याचा आवाज ऐकल्यानंतर मी घर सोडलं. कोणालाही न सांगता मी घरातून पळून आलो. अशा तीन फेऱ्या माझ्या झाल्या. दोन वेळा मला घरी नेण्यात आलं. शेवटी तिसऱ्यांदा ठरवलं जगेन, मरेन, पण मला गेलं पाहिजे. त्यावेळी ज्या शाळेमध्ये मी शिकलो त्या शाळेत दोन-चार गोष्टींची पुस्तक वाचली होती. त्याचा उपयोग कथाकथनाच्या कार्यक्रमामध्ये केला. मला आजही आठवतंय, तेव्हा ९० रुपये २५ पैसे अशी चिल्लर गोळा झाली. ते ९० रुपये २५ पैसे एका रुमालात बांधले आणि तेव्हा मी तिसऱ्यांदा घरातून पळून निघालो."
त्यानंतर पुढे अशोक समर्थ म्हणाले, "त्या ९० रुपये २५ पैशांवरती मी कोल्हापूर, सांगली, कराडमध्ये काही दिवस काढले. तिथे एका एकांकिकेच्या निमित्ताने माझा एका सहकलाकार मित्र आणि आम्ही एकांकिकेसाठी बारामतीला गेलो. त्यामुळे एक वेगळाच आत्मविश्वास आला. पण, ते ९० रुपये किती दिवस पुरणार? असा तो भयाण प्रवास करत पुणे गाठलं."
फूटपाथवर झोपून काढले दिवस
"माझा आयुष्यातील पहिला जॉब हा वेटरचा होता. त्या कामाचे मला ६०० रुपये मिळायचे. त्यानंतर मग पहिल्यांदा मी एका कॉटबेस पद्धतीच्या घरामध्ये झोपलो. त्यादरम्यानच्या काळात मी संभाजी पार्क, सारसबाग आणि रेल्वे स्टेशनवर झोपलो. फूटपाथ हे माझं झोपण्याचं ठिकाण होतं. त्यानंतर मग मला नोकरी मिळाली." असा प्रेरणादायी प्रवास अशोक समर्थ यांनी सांगितला.