गायिका तुलसी कुमारचं 'माँ' गाणं रिलीज, मायलेकीच्या भावनिक नात्याचं दर्शन घडवणारा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 11:42 IST2025-07-31T11:40:50+5:302025-07-31T11:42:21+5:30
Tulsi Kumar New Song: गायिका तुलसी कुमार खऱ्या आयुष्यात एका मुलाची आहे. त्यामुळे तिच्या परफॉर्मन्समध्ये ते भाव आले आहेत.

गायिका तुलसी कुमारचं 'माँ' गाणं रिलीज, मायलेकीच्या भावनिक नात्याचं दर्शन घडवणारा अनुभव
Tulsi Kumar New Song: गायिका तुलसी कुमारचं (Tulsi Kumar) नवीन गाणं 'माँ' नुकतंच रिलीज झालं आहे. या गाण्याचा व्हिडिओही चर्चेत आहे. अभिनेत्री झरीना वहाब आणि तुलसी कुमार मायलेकीच्या भूमिकेत आहेत. आईच्या नि:स्वार्थी प्रेमाला या व्हिडिओतून सुंदररित्या दर्शवण्यात आलं आहे. तसंच आई आणि मुलीच्या दृष्टिकोनातून भावना आणि कृतज्ञतेचं दर्शन यामध्ये घडवण्यात आलं आहे . गाण्याला पायल देव यांनी संगीत दिलं असून मनोज मुंतशीर शुक्ला यांनी गाण्याचे शब्द लिहिले आहेत. या म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन रंजू वर्गीस यांनी केलं आहे.
गायिका तुलसी कुमार खऱ्या आयुष्यात एका मुलाची आहे. त्यामुळे तिच्या परफॉर्मन्समध्ये ते भाव आले आहेत. तसंच तिच्या डान्समध्ये एक संयम बघायला मिळतो जो तिने सहजरित्या आणला आहे. आई आणि मुलीमध्ये असलेल्या प्रेमाचं अचूक दर्शन घडवताना मायलेकीचा हळुवार स्पर्श, प्रामाणिक आणि भावनांनी भरलेला दाखवला आहे.
या गाण्याबद्दल बोलताना तुलसी म्हणाली, "हे गाणं माझ्या मनाच्या खूप जवळ आहे. मी स्वत: एक मुलगी आणि आई आहे. त्यामुळे प्रत्येक शब्दाचा अर्थ मनाला भावणारा होता. गाण्याची कोरिओग्राफी मात्र माझ्यासाठी नवीनच होती. कारण प्रत्येक शब्दासाठी वेगळ्या स्टेप्स होत्या. त्यासाठी रंजू आणि कादंबरीचं खरोखर कौतुक. गाण्यावर परफॉर्म करताना मला सतत असंच वाटत होतं की जे मी ओरडून सांगू शकत नाही ते मला या माध्यमातून सांगता येत आहे."
'माँ' या म्युझिक व्हिडिओमध्ये परफॉर्म करताना अभिनेत्री जरीना वहाब यांनाही अश्रू अनावर झाले होते. 'माँ' हे गाणं सर्व म्युझिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झालं आहे. टी सीरिजच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर गाण्याता व्हिडिओही आहे.