"आजोबांबरोबर मी त्यांना भेटले होते तेव्हा...", रतन टाटा यांच्या निधनानंतर श्रिया पिळगावकरने सांगितली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 13:30 IST2024-10-10T13:29:14+5:302024-10-10T13:30:28+5:30
रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशासह जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

"आजोबांबरोबर मी त्यांना भेटले होते तेव्हा...", रतन टाटा यांच्या निधनानंतर श्रिया पिळगावकरने सांगितली आठवण
Ratan Tata Demise: ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशासह जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अनेक सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लेक आणि अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिनेदेखील रतन टाटा यांच्या निधनानंतर पोस्ट शेअर केली आहे. श्रियाने रतन टाटा यांची एक आठवण सांगितली आहे.
श्रिया पिळगावकरची पोस्ट
One in a million. Sir Ratan Tata. (1937-2024)
नम्रता, उदारता आणि दयाळू अंत:करणाने तुम्ही एक वैभवशाली आयुष्य जगलात. देश आणि जगासाठी मोलाचं योगदान देण्याबरोबरच तुमच्या मानवतेच्या भावनेने अनेकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने वारसा मागे सोडून जात आहात. तुमच्यासारख्या अनेक व्यक्तींची या जगाला गरज आहे.
शंतनू नायडू यांनी सुरू केलेल्या आणि रतन टाटा यांनी समर्थन दिलेल्या गुड फेलो इंडियाबरोबर काम करण्याचं मला भाग्य मिळालं. तेव्हा मी माझ्या आजोबांबरोबर त्यांना भेटले होते आणि त्यांचे आशीर्वाद मला मिळाले. प्रामाणिकपणा, परोपकार आणि नैतिक नेतृत्व यांची तुम्ही एक ज्योत होतात. ज्यांनी आम्हाला चांगल्या गोष्टींवर विशवास ठेवण्यास भाग पाडलं, त्यासाठी आभार.
दरम्यान, टाटा समूहाने दिलेल्या माहितीनुसार, रतन टाटा यांचे पार्थिव आज दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स लॉनमध्ये सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी लोकांना रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.