"टर्मिनेटरसारखी फिरतेय..." श्रद्धा कपूरच्या पायाला दुखापत, स्वत: व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 08:32 IST2025-11-24T08:31:21+5:302025-11-24T08:32:39+5:30
'ईठा' सिनेमाच्या शूटवेळी श्रद्धाच्या पायाला दुखापत झाली आहे.

"टर्मिनेटरसारखी फिरतेय..." श्रद्धा कपूरच्या पायाला दुखापत, स्वत: व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
अभिनेत्री श्रद्धा कपूरला 'ईठा' सिनेमाच्या शूटिंगवेळी दुखापत झाल्याची बातमी समोर आली होती. 'छावा'फेम लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या सिनेमात श्रद्धाची मुख्य भूमिका आहे. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांच्या भूमिकेत ती दिसणार आहे. यासाछी श्रद्धाला नृत्याची प्रचंड मेहनत करावी लागत आहे. श्रद्धाने यासाठी वजनही वाढवलं आहे. अशाच एका सीनवेळी श्रद्धाच्या पायाला दुखापत झाली. आता तिने स्वत: व्हिडीओ शेअर करत हेल्थ अपडेट दिलं आहे.
श्रद्धा कपूरने नुकतंच सोशल मीडियावरुन चाहत्यांशी संवाद साधला. तेव्हा दुखापतीबद्दल ती म्हणाली, "माझ्या पायाची दुखापत कशी आहे? हे बघा..टर्मिनेटरसारखी फिरत आहे. स्नायूंना दुखापत झाली आहे. पण लवकरच ठीक होईल. थोडी विश्रांती घ्यायला सांगितली आहे. मी नक्की बरी होईन." श्रद्धाने हा व्हिडीओ शेअर करत तिच्या पायाची दुखापतही दाखवली. पायाला प्लॅस्टर लावलेलं दिसत आहे.
श्रद्धाच्या चाहत्यांनी 'लवकर बरी हो' अशी प्रार्थना केली आहे. याच महिन्यात 'ईठा' सिनेमाचं शूट सुरु झालं होतं. नाशिकजवळील एका गावात हे शूट होतं. लावणी सीक्वेन्सवेळी श्रद्धाचा पाय फ्रॅक्चर झाला. यामुळे सिनेमाची टीम मुंबईत परत आली. आता श्रद्धाला दोन आठवड्यांसाठी आराम करण्याचा सल्ला दिला असून नंतर ती पुन्हा शूटला सुरुवात करणार आहे.
विठाबाई नारायणगांवकर यांच्या जीवनावर आधारित 'ईठा' हा सिनेमा आहे. त्या तमाशा-लावणी सम्राज्ञी होत्या. दोन वेळा त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कारही मिळाला होता. त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग अवाक करणारे आहेत तेच लक्ष्मण उतेकर सिनेमाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवणार आहेत. अशा दिग्गज व्यक्तीची भूमिका श्रद्धा मोठ्या पडद्यावर साकारत आहे. अद्याप या सिनेमाची अधिकृत घोषणा झालेली नाही.