श्रद्धा कपूरने दिली आनंदाची बातमी!; 'थामा'च्या ट्रेलर लाँचला म्हणाली- "पुढच्या काही दिवसात..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 09:27 IST2025-09-27T09:26:58+5:302025-09-27T09:27:34+5:30
श्रद्धा कपूरने प्रेक्षकांना एक खास गोष्ट सांगितली. त्यामुळे प्रेक्षकांनी तिचं अभिनंदन केलंय. काय म्हणाली श्रद्धा?

श्रद्धा कपूरने दिली आनंदाची बातमी!; 'थामा'च्या ट्रेलर लाँचला म्हणाली- "पुढच्या काही दिवसात..."
श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. श्रद्धाला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. बॉलिवूडमधील 'स्त्री' अशी तिची ओळख आहे. अशातच श्रद्धा काल हॉरर कॉमेडी युनिव्हर्समधील पुढील सिनेमा 'थामा'च्या ट्रेलर लाँचला आली होती. त्यावेळी श्रद्धा कपूरने एक खास गुड न्यूज दिली. त्यामुळे सर्वांनी तिचं अभिनंदन केलंय. काय म्हणाली श्रद्धा?
श्रद्धाने दिली सर्वांना खास गुड न्यूज
श्रद्धाने बॉलिवूडची लोकप्रिय हॉरर-कॉमेडी फ्रेंचायझी 'स्त्री'च्या चाहत्यांसाठी एक मोठी आणि रोमांचक बातमी दिली आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरने घोषणा केली आहे की, या हिट चित्रपटावर आधारित 'छोटी स्त्री' नावाचा एक ॲनिमेटेड चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट बच्चेकंपनीसह मोठ्या प्रेक्षकांसाठी खास तयार करण्यात येत आहे.
श्रद्धा कपूरने ही महत्त्वाची घोषणा मॅडॉक फिल्म्सच्या आगामी 'थामा' चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात केली. यावेळी निर्माता दिनेश विजन आणि अभिनेता आयुष्मान खुराना देखील उपस्थित होते. श्रद्धा कपूरने सांगितले की, मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्स आता 'छोटी स्त्री' घेऊन येत आहे, जी फिल्म थिएटरमध्ये सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी रिलीज केली जाईल.
'स्त्री ३' शी जोडली जाईल कहाणी
दिनेश विजन यांनी यावेळी खुलासा केला की, 'छोटी स्त्री' मधले सर्वात मोठे सरप्राईज या चित्रपटाचा क्लायमॅक्स असणार आहे. त्यांनी सांगितले की, अमर कौशिक आणि निरेन भट्ट यांनी या ॲनिमेटेड चित्रपटाची संकल्पना मांडली आहे आणि याची कथा थेट 'स्त्री ३' शी जोडली जाईल. म्हणजेच, ॲनिमेशन चित्रपटाचा शेवट एका लाइव्ह-ॲक्शन सीनने होईल, जो 'स्त्री ३' ची सुरुवात करेल आणि प्रेक्षकांना 'स्त्री'ची बॅकस्टोरी (मागील कहाणी) दाखवेल.
२०१८ मध्ये आलेल्या पहिल्या 'स्त्री' चित्रपटानंतर 'रुही', 'भेडिया' आणि नुकताच 'मुंज्या' यांसारखे चित्रपट याच हॉरर युनिव्हर्सचा भाग बनले. २०२४ मध्ये रिलीज झालेल्या 'स्त्री २' ने तर बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींहून अधिक कमाई करून हिंदीतील सर्वात मोठा हिट चित्रपट होण्याचा मान मिळवला होता. आता 'छोटी स्त्री' या मालिकेत एक नवा आणि मनोरंजक अध्याय जोडणार आहे.
दरम्यान, याच कार्यक्रमात मॅडॉक फिल्म्सच्या 'थामा' या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला. या चित्रपटात आयुषमान खुरानासोबत रश्मिका मंदाना, नवाजुद्दीन सिद्दिकी आणि परेश रावल प्रमुख भूमिकेत आहेत. 'मुंज्या' फेम दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट २१ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल.