६० कोटी घोटाळ्याचा आरोप, शिल्पा शेट्टीचा मोठा निर्णय! मुंबईतील 'बॅस्टियन' रेस्टॉरंटला लागणार कुलूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 12:41 IST2025-09-03T12:40:47+5:302025-09-03T12:41:24+5:30
सेलिब्रिटींमध्ये लोकप्रिय असलेल्या 'बॅस्टियन' रेस्टॉरंटला आता टाळं लागणार आहे. कारण, हे रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय शिल्पा शेट्टीने घेतला आहे.

६० कोटी घोटाळ्याचा आरोप, शिल्पा शेट्टीचा मोठा निर्णय! मुंबईतील 'बॅस्टियन' रेस्टॉरंटला लागणार कुलूप
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचं मुंबईतील वांद्रे येथील 'बॅस्टियन' रेस्टॉरंट अनेक कारणांमुळे चर्चेत असायचं. सेलिब्रिटींसोबतच चाहत्यांचंही हे आवडतं रेस्टॉरंट. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालने त्यांचं वेडिंग रिसेप्शनही शिल्पा शेट्टीच्या या रेस्टॉरंटमध्ये ठेवलं होतं. सेलिब्रिटींमध्ये लोकप्रिय असलेल्या 'बॅस्टियन' रेस्टॉरंटला आता टाळं लागणार आहे. कारण, हे रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय शिल्पा शेट्टीने घेतला आहे. याबाबत अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की "मुंबईतील आयकॉनिक असलेलं 'बॅस्टियन बांद्रा' हे रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्यामुळे या गुरुवारी एका युगाचा अंत होणार आहे. ज्या रेस्टॉरंटने आम्हाला अगणित आठवणी, अविस्मरणीय रात्री आणि या शहाराच्या नाईटलाइफला काही खास क्षण दिले ते आता बंद होत आहे. या जागेचा सन्मान राखण्यासाठी आम्ही आमच्या काही जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत एक खास संध्याकाळ सेलिब्रेट करू. जुन्या आठवणी, एनर्जी आणि एक अविस्मरणीय रात्र जिथे 'बॅस्टियन'सोबत जोडल्या गेलेली प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट केली जाईल. 'बॅस्टियन बांद्रा'ला गुडबाय देतानाच गुरुवारची परंपरा आर्केन अफेअर पुढच्या आठवड्यापासून 'बॅस्टियन अॅट द टॉप' येथे सुरू राहील".
शिल्पा शेट्टीने २०१६ मध्ये 'बॅस्टियन बांद्रा' हे रेस्टॉरंट सुरू केलं होतं. आता ९ वर्षांनी हे रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिल्पा शेट्टी आणि पती राज कुंद्रावर ६० कोटी घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर काहीच दिवसांनी हे रेस्टॉरंट बंद केलं जात आहे. हे रेस्टॉरंट सी फूडसाठी विशेष प्रसिद्ध होतं.