शेरी सिंग ठरली 'मिसेस युनिव्हर्स २०२५'चा किताब पटकावणारी पहिली भारतीय; सौंदर्याची जगाने घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 18:56 IST2025-10-10T18:51:13+5:302025-10-10T18:56:04+5:30
'मिसेस युनिव्हर्स २०२५' स्पर्धा झाली असून शेरी सिंगने मानाचा किताब पटकावला असून भारतीय जनतेसाठी

शेरी सिंग ठरली 'मिसेस युनिव्हर्स २०२५'चा किताब पटकावणारी पहिली भारतीय; सौंदर्याची जगाने घेतली दखल
भारतीय जनतेसाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. शेरी सिंगने (Sherry Singh) 'मिसेस युनिव्हर्स २०२५' (Mrs. Universe 2025) चा प्रतिष्ठित मुकुट जिंकून इतिहास रचला आहे. मिसेस युनिव्हर्सचा हा सन्मान मिळवणारी शेरी सिंग ही पहिली भारतीय स्पर्धक ठरली आहे. फिलिपीन्सची राजधानी मनिला येथील 'ओकाडा' येथे 'मिसेस युनिव्हर्स'ची ४८ वी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जगभरातील १२० सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
शेरी सिंग मिसेस युनिव्हर्स जिंकणारी पहिली भारतीय
शेरी सिंगने 'मिसेस इंडिया २०२५'चा किताब जिंकल्यानंतर 'मिसेस युनिव्हर्स २०२५'मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. स्पर्धेत तिने केवळ सौंदर्यानेच नाही, तर तिचा शांत आणि आत्मविश्वासपूर्ण स्वभाव, प्रभावी वक्तृत्व अशा गुणांनी तिने जगाचं लक्ष वेधलं. याशिवाय महिला सक्षमीकरण व मानसिक आरोग्य यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विचारांनी तिने परीक्षकांनाही प्रभावित केलं.
'हे यश प्रत्येक महिलेचे आहे'
'मिसेस युनिव्हर्स २०२५'चा मुकुट परिधान केल्यानंतर शेरी सिंग भावना व्यक्त करत म्हणाली की, "हा विजय फक्त माझा नाही, तर हा विजय त्या प्रत्येक स्त्रीचा आहे जिने मर्यादांच्या पलीकडे जाण्याचंं स्वप्न पाहिलं आहे. खरं सौंदर्य शक्ती आणि दयाळूपणा यात आहे, हे मला जगाला दाखवायचं होतं."
'मिसेस युनिव्हर्स' ही स्पर्धा केवळ शारीरिक सौंदर्याच नव्हे तर बुद्धिमत्ता, प्रेम आणि सामाजिक जबाबदारीचा सन्मान करते. 'यूएमबी पेजेंट्स'च्या राष्ट्रीय संचालिका उर्मिमाला बरुआ यांनी सांगितले की, "आम्हाला शेरीच्या क्षमतेवर नेहमीच विश्वास होता. तिच्या या ऐतिहासिक विजयामुळे भारताला अभिमान वाटला आहे आणि देशाचं प्रतिनिधित्व करू इच्छिणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी एक नवीन बेंचमार्क सेट झाला आहे."