"आजारी असतानाही ते खूप..."; शत्रुघ्न सिन्हा यांनी जागवली धर्मेंद्र यांच्या शेवटच्या भेटीची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 13:14 IST2025-11-25T13:13:25+5:302025-11-25T13:14:27+5:30
शेवटच्या काळात धर्मेंद्र यांना भेटल्यावर त्यांची अवस्था कशी होती, याचा खुलासा शत्रुघ्न सिन्हांनी केला आहे. काय म्हणाले अभिनेते?

"आजारी असतानाही ते खूप..."; शत्रुघ्न सिन्हा यांनी जागवली धर्मेंद्र यांच्या शेवटच्या भेटीची आठवण
बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि त्यांचे चाहते शोकसागरात बुडाले आहेत. २४ नोव्हेंबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे जवळचे मित्र आणि सहकलाकार शत्रुघ्न सिन्हा यांनी नुकत्याच एका मुलाखतीत धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला.
शेवटच्या भेटीची आठवण
धर्मेंद्र यांना जेव्हा रुग्णालयातून घरी आणलं होतं, तेव्हा शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या पत्नीने त्यांची भेट घेतली होती. त्या भेटीबद्दल बोलताना सिन्हा म्हणाले, "धर्मेंद्र हे या पृथ्वीवरील सर्वात सुंदर माणसांपैकी एक होते. मी आणि माझी पत्नी त्यांना भेटायला गेलो, तेव्हा ते बिछान्यावर विश्रांती घेत होते. त्यांच्या चेहऱ्यावर सुंदर हास्य होतं. आजारी असतानाही ते खूप देखणे आणि तेजस्वी दिसत होते."
धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारत असल्याचा विश्वास त्यावेळी सर्वांना वाटत होता. त्याबद्दल शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले, "आम्हाला वाटत होतं की ते लवकरच बरे होतील. पण कदाचित ते एक स्वप्न होतं. ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, ती आपल्याला सोडून जाईल, असा विचार करण्याची आपली इच्छा नसते."
हेमा मालिनी यांच्यासाठी व्यक्त केल्या भावना
धर्मेंद्र यांच्या निधनामुळे त्यांची पत्नी आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यावर कोसळलेल्या दुःखाबद्दल बोलताना शत्रुघ्न सिन्हा भावूक झाले. धर्मेंद्र आणि हेमा मालिनी या दोघांशीही आपले जवळचे संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.
सिन्हा म्हणाले, "धर्मेंद्र आणि हेमा यांच्याशी माझे खूप जवळचे संबंध होते. हेमा मालिनी सध्या ज्या परिस्थितीतून जात असतील, त्याचा विचार करून मला खूप भीती वाटत आहे. त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात केवळ एकाच व्यक्तीवर प्रेम केले. माझं धाडस होत नाहीये की, मी हेमाला फोन करून तीचं सांत्वन करू शकेन. सध्या तरी मी त्यांना फोन करणार नाही."
शत्रुघ्न सिन्हा यांनी सोशल मीडियावरही धर्मेंद्र यांच्यासोबतचे जुने फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. धर्मेंद्र हे पंजाब आणि महाराष्ट्राचा गौरव होते. ते विनम्र आणि दयाळू माणूस होते. त्यांच्या जाण्याने फिल्म इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.