दोन फ्लॉप सिनेमांनंतरही स्टारकिडला मिळाला तिसरा चित्रपट, 'या' अभिनेत्यासोबत झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 10:39 IST2026-02-28T10:39:10+5:302026-02-28T10:39:36+5:30

अभिनेत्रीच्या या नव्या सिनेमाचं बरंच शूट गोव्यात झालं

shanaya kapoor gave two flop films and now she has third film in line with munjya fame abhay verma | दोन फ्लॉप सिनेमांनंतरही स्टारकिडला मिळाला तिसरा चित्रपट, 'या' अभिनेत्यासोबत झळकणार

दोन फ्लॉप सिनेमांनंतरही स्टारकिडला मिळाला तिसरा चित्रपट, 'या' अभिनेत्यासोबत झळकणार

बॉलिवूड अभिनेत्री शनाया कपूरने गेल्या वर्षी 'आंखों की गुस्ताखियां' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. विक्रांत मेस्सीसोबत तिने स्क्रीन शेअर केली होती. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्यानंतर यावर्षी १३ फेब्रुवारीला प्रदर्शित झालेला तिचा 'तू या मैं' हा चित्रपटही प्रेक्षकांच्या अपेक्षेवर खरा उतरला नाही. आदर्श गौरव आणि शनायाची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. सलग दोन अपयशानंतर आता शनाया कपूर एका नवीन चित्रपटासह मोठ्या पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे.

शनाया कपूरच्या या आगामी चित्रपटाची निर्मिती विकेश भूटानी करत आहेत. 'मिड डे'च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे नाव 'जैकब कार्डोसो' (Jacob Cardoso) असे ठेवण्यात आले आहे. सिनेमात शनाया कपूरसोबत 'मुंज्या' चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता अभय वर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या नव्या जोडीला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आता उत्सुक आहेत. शुजात सौदागर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या या चित्रपटावर गेल्या वर्षीपासूनच काम सुरू झाले होते.

'जैकब कार्डोसो' या चित्रपटाची कथा १९८७ च्या काळावर आधारित आहे. निर्माते विकेश भूटानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट गोव्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. ज्या काळात गोव्याला राज्याचा दर्जा मिळत होता, त्या कालखंडातील ही गोष्ट आहे. हा चित्रपट प्रामुख्याने एक कॉमेडी ड्रामा असून त्याच्या केंद्रस्थानी एक रोमँटिक ट्रॅक पाहायला मिळणार आहे. शनायाचे आधीचे दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरल्यामुळे, या तिसऱ्या चित्रपटाकडून तिच्या चाहत्यांना खूप मोठ्या अपेक्षा आहेत.

या चित्रपटाचे चित्रीकरण मार्च २०२५ मध्ये सुरू झाले असून गोव्यातील सलग दोन महिन्यांच्या शेड्यूलमध्ये मुख्य चित्रीकरण पूर्ण झाले आहे. सध्या हा चित्रपट पोस्ट-प्रोडक्शनच्या शेवटच्या टप्प्यात असून प्रेक्षक आता याच्या प्रदर्शनाच्या तारखेची वाट पाहत आहेत. 'चॉकबोर्ड एंटरटेनमेंट', 'वाउव एमिरेट्स' आणि 'कर्मा मीडिया अँड एंटरटेनमेंट' यांनी संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शनाया कपूरसाठी हा चित्रपट तिच्या करिअरला नवी दिशा देणारा ठरेल का हे पाहणं महत्वाचं आहे.

Web Title: shanaya kapoor gave two flop films and now she has third film in line with munjya fame abhay verma