राकेश बापटशी ब्रेकअप झाल्यानंतर शमिता शेट्टी पुन्हा प्रेमात? कोणाला करतेय डेट? अभिनेत्रीने दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 09:22 IST2026-02-05T09:18:42+5:302026-02-05T09:22:41+5:30
शमिता आणि राकेश रिलेशनशिपमध्ये असतानाच पुढे त्यांचं ब्रेकअप झालं. राकेशसोबत नातं तुटल्यावर शमिता पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये आहे, अशी चर्चा आहे.

राकेश बापटशी ब्रेकअप झाल्यानंतर शमिता शेट्टी पुन्हा प्रेमात? कोणाला करतेय डेट? अभिनेत्रीने दिलं स्पष्टीकरण
सध्या 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात राकेश बापट चांगलाच चर्चेत आहे. टास्कमध्ये उत्तम खेळ आणि परखड-स्पष्ट स्वभावाच्या जोरावर राकेश बापटच्या खेळाचं कौतुक होतंय. राकेशने याआधी 'बिग बॉस ओटीटी'मध्येही सहभाग घेतला होता. यावेळी त्याची जोडी शमिता शेट्टीसोबत जमली होती. शमिता आणि राकेश रिलेशनशिपमध्ये असतानाच पुढे त्यांचं ब्रेकअप झालं. राकेशसोबत नातं तुटल्यावर शमिता पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये आहे, अशी चर्चा आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आणि शिल्पा शेट्टीची धाकटी बहीण शमिता शेट्टी सध्या एका 'टेक्नो आर्टिस्ट'ला डेट करत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. शमिताने अलीकडेच तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन केलं. त्यावेळी तिचे बॉयफ्रेंडसोबतचे खास फोटो समोर आल्याचं बोललं गेलं.
शमिताने नुकताच आपला ४७ वा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनमध्ये तिची बहीण शिल्पा शेट्टी, पती राज कुंद्रा आणि जवळचे मित्र सहभागी झाले होते. मात्र, या गर्दीत दीपेश शर्मा या व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दीपेश हा एक प्रसिद्ध टेक्नो आर्टिस्ट, निर्माता आणि उद्योजक आहे. याशिवाय 'मिलाग्रो' (Milagro) सारख्या प्रसिद्ध रेस्टो-बार ठिकाणांचा तो सह-संस्थापक आहे.
दीपेशनेही शमितासोबतचे काही न पाहिलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, "माझ्या कायमच्या 'लाफ्टर रायट'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा! अशा व्यक्तीला, जिला माझ्या सर्व गोष्टी माहीत आहेत आणि तरीही ती माझ्यासोबत खंबीरपणे उभी आहे. आय लव्ह यू, माय शॅमस्टर!" (Love you, my Shamster). या पोस्टवर शमिताने देखील लव्ह रिअॅक्शन दिली आहे.
परंतु आता या चर्चांवर शमिताने खुलासा केला आहे. शमिता म्हणाली, "मी सिंगल आणि शांतपणे आयुष्य जगत आहे. खऱ्या मैत्रीचा चुकीचा अर्थ लावून संकुचित विचार करणं थांबवा. हे सगळं अत्यंत मूर्खपणाचं आहे." त्यामुळे सध्या शमिता कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नाही, हे स्पष्ट झालं आहे.