"शो जिंकणं हा उद्देशच नव्हता", शक्ती कपूर यांनी सांगितलं बिग बॉसमधील प्रवेशाचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 16:25 IST2024-12-25T16:24:59+5:302024-12-25T16:25:24+5:30
२०११ साली शक्ती कपूर 'बिग बॉस सीझन ५' मध्ये दिसले होते

"शो जिंकणं हा उद्देशच नव्हता", शक्ती कपूर यांनी सांगितलं बिग बॉसमधील प्रवेशाचं कारण
शक्ती कपूर (Shakti Kapoor) बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय व्हिलन. ९० च्या दशकात त्यांच्या सिनेमांतील भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. कधी विनोदी तर कधी खतरनाक भूमिकेतही ते दिसले. शक्ती कपूर यांची लेक श्रद्धा कपूरनेही (Shraddha Kapoor) इंडस्ट्रीत आपलं स्थान कमावलं आहे. दरम्यान काही वर्षांपूर्वी शक्ती कपूर यांनी बिग बॉसमध्ये प्रवेश घेतला होता. त्यांनी श्रद्धासाठीच बिग बॉसमध्ये एन्ट्री घेतली असा खुलासा नुकताच केला.
'बिग बॉस' जिंकणं हा उद्देश कधीच नव्हता
शक्ती कपूर २०११ साली 'बिग बॉस सीझन ५' मझ्या आले होते. 'रेडिफ डॉट कॉम'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यामागचा उद्देश सांगितला. ते म्हणाले, "मी शो जिंकण्यासाठी तिथे गेलोच नव्हता. माझा तिथे प्रवेश करण्याचा उद्देश हा होता कारण मी श्रद्धाला वचन दिलं होतं की मी दारुपासून दूर राहीन. मला माझ्या मुलांना हे सिद्ध करुन दाखवायचं होतं की मी १ महिना दारुपासून दूर राहू शकतो."
ते पुढे म्हणाले, "मला याचा आनंद आहे की मी हे सिद्ध करु शकलो. ज्या वेळी कॅप्टन झालो तेव्हा घरात कोणतीच भांडणंही झाली नाही. माझ्या कुटुंबाला याचा खूप अभिमान वाटतो. माझी मुलगी श्रद्धा म्हणते की पुढच्या जन्मातही तिला मीच बाबा म्हणून हवा आहे. माझी पत्नी माझ्यावर आधीपेक्षा जास्त प्रेम करायला लागली आहे. ती मला आणखी एका हनिमूनवरही घेऊन जाणार आहे."
बिग बॉस सीझन ५ मध्ये शक्ती कपूर २८ दिवस राहिले होते. नंतर त्यांना घराबाहेर पडावं लागलं. मात्र त्यांनी मुलांना दिलेलं आश्वासन पूर्ण करुन दाखवलं.