शिक्षणातही 'किंग'! शाहरुख खानची मार्कशीट व्हायरल; अर्थशास्त्रात ९२ तर गणितात होते 'इतके' गुण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 12:44 IST2025-12-01T12:42:14+5:302025-12-01T12:44:52+5:30
शाहरुख खानची कॉलेजमधील मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यात शाहरुख शिक्षणात किती हुशार होता, हे पाहायला मिळतंय

शिक्षणातही 'किंग'! शाहरुख खानची मार्कशीट व्हायरल; अर्थशास्त्रात ९२ तर गणितात होते 'इतके' गुण
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा केवळ पडद्यावरील सुपरस्टार नाही, तर तो कॉलेज जीवनातही तेवढाच हुशार विद्यार्थी होता, हे त्याच्या नुकत्याच व्हायरल झालेल्या मार्कशीटमधून सिद्ध झाले आहे. शाहरुखच्या चाहत्यांसाठी ही माहिती नक्कीच खास आहे.
अनेकदा 'रोमान्सचा किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुखचे शैक्षणिक गुण पाहून चाहत्यांना त्याच्या यशस्वी प्रवासाची एक वेगळी बाजू पाहायला मिळाली आहे. शाहरुख खानचे महाविद्यालयीन शिक्षण आणि त्याच्या गुणांची माहिती देणारी ही मार्कशीट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अर्थशास्त्रात ९२ गुण, गणित-फिजिक्समध्ये किती?
शाहरुखने दिल्लीच्या 'हंसराज कॉलेज'मधून शिक्षण घेतलं आहे. याच कॉलेजमधून शाहरुखने १९८५ ते १९८८ या काळात अर्थशास्त्र या विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. या मार्कशीटनुसार, शाहरुख खानने आपल्या अर्थशास्त्र या विषयात सर्वाधिक ९२ गुण मिळवले होते, तर इंग्रजी विषयात त्याला ५१ गुण मिळाले होते. विशेष म्हणजे गणित (Maths) आणि भौतिकशास्त्र (Physics) यांसारख्या विषयातही त्याने उत्कृष्ट कामगिरी करत प्रत्येकी ७८ गुण मिळवले होते.
हे आकडे पाहून अनेक चाहत्यांनी शाहरुखचं कौतुक केले आहे. सुपरस्टार होण्यापूर्वी शाहरुख शिक्षणातही किती हुशार होता, हे यावरुन सर्वांना पाहायला मिळतंय.

कॉलेज ते सुपरस्टारडमचा प्रवास
कॉलेज शिक्षण पूर्ण केल्यानंतर शाहरुखने दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला होता. मात्र, नशिबाने त्याला मनोरंजनाच्या जगाकडे वळवले. एका सामान्य कॉलेज विद्यार्थ्यापासून ते टीव्ही अभिनेता आणि नंतर बॉलिवूडचा सर्वात मोठा स्टार बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
सध्या शाहरुख खान आपल्या आगामी 'किंग' या चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तो त्याची मुलगी सुहाना खान आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.