'पठाण', 'जवान' नंतर किंग खान तिसऱ्यांदा वैष्णोदेवीच्या दर्शनाला, 'डंकी'च्या यशासाठी साकडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 11:43 IST2023-12-12T11:38:11+5:302023-12-12T11:43:27+5:30

शाहरुखने याआधी 'पठाण' आणि 'जवान' च्या रिलीजपूर्वीही वैष्णोदेवीचे दर्शन घेतले होते.

Shahrukh Khan took blessings at Vaishnodevi Temple before release of his next movie Dunki | 'पठाण', 'जवान' नंतर किंग खान तिसऱ्यांदा वैष्णोदेवीच्या दर्शनाला, 'डंकी'च्या यशासाठी साकडं

'पठाण', 'जवान' नंतर किंग खान तिसऱ्यांदा वैष्णोदेवीच्या दर्शनाला, 'डंकी'च्या यशासाठी साकडं

बॉलिवूडचा 'बादशाह' शाहरुख खानसाठी (Shahrukh Khan) 2023 हे वर्ष खूपच खास ठरलं. ४ वर्षांनंतर जबरदस्त कमबॅक करत त्याने वर्षाच्या सुरुवातीलाच 'पठाण' हा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला. यानंतर काही महिन्यात रिलीज झालेल्या 'जवान' सिनेमानेही धुमाकूळ घातला. आता वर्षाच्या शेवटी त्याचा 'डंकी' (Dunki) रिलीज होत आहे. पठाण आणि जवान दोन्ही सिनेमांच्या रिलीजआधी शाहरुखने वैष्णोदेवीचे दर्शन घेतले होते. तर आता 'डंकी' च्या रिलीजआधीही तो वैष्णोदेवीच्या दर्शनाला पोहोचला आहे. 

राजकुमार हिरानी दिग्दर्शित 'डंकी' सिनेमात शाहरुखने पहिल्यांदाच हिरानींसोबत काम केले आहे. '3 इडियट्स','मुन्नाभाई एमबीबीएस' सारखे सुपरहिट सिनेमे देणारे राजकुमार हिरानी यांनी 'डंकी'साठी शाहरुख खानची निवड केली. सिनेमात शाहरुख आणि तापसी पन्नूची जोडी आहे. तर विकी कौशलने स्पेशल अॅपिअरन्स केला आहे. डंकीच्या रिलीजला काहीच दिवस शिल्लक राहिले असताना शाहरुखने आज सकाळीच वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. सुरक्षारक्षकांच्या घेरावात शाहरुख खानने कोणी ओळखू नये म्हणून हुडी घालत चेहरा झाकला होता. पहाटेच त्याने मंदिरात प्रवेश केला. शाहरुखचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. PTI ने हा व्हिडिओ ट्वीट केला आहे.

'डंकी' सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. थोडा कॉमेडी आणि थोडी गंभीर अशा या ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता ताणली आहे. तसंच सिनेमातील 'लुट पूट गया' या गाण्यालाही प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. २२ डिसेंबरला 'डंकी' सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Web Title: Shahrukh Khan took blessings at Vaishnodevi Temple before release of his next movie Dunki