"शाहरुखने भारत सोडून दुबईत राहायला जावं"; प्रसिद्ध दिग्दर्शकाचा किंग खानवर संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 10:38 IST2025-10-10T10:34:44+5:302025-10-10T10:38:35+5:30
शाहरुखने भारत सोडावा, असं म्हणत प्रसिद्ध दिग्दर्शकाने किंग खानवर राग व्यक्त केलाय. काय घडलं नेमकं? काय आहे कारण?

"शाहरुखने भारत सोडून दुबईत राहायला जावं"; प्रसिद्ध दिग्दर्शकाचा किंग खानवर संताप
'दबंग' आणि 'बेशरम' चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप यांनी पुन्हा एकदा बॉलिवूडमधील एका सुपरस्टारवर टीका केली आहे. अभिनेता सलमान खानवर गंभीर आरोप केल्यानंतर, अभिनव यांनी आता शाहरुख खानवर थेट हल्ला चढवला आहे. शाहरुख खानने भारत सोडून दुबईतील त्याच्या घरी राहायला जावं, असं विधान अभिनव कश्यप यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. नेमकं काय म्हणाले अभिनव कश्यप?
अभिनव कश्यप यांची शाहरुख खानवर जोरदार टीका
बॉलिवूड ठिकाणाला दिलेल्या एका मुलाखतीत अभिनव कश्यप यांनी शाहरुख खानसंबंधी वक्तव्य केलंय की, "शाहरुख खानच्या दुबईतील घराला 'जन्नत' म्हणतात, तर मुंबईतील घराला 'मन्नत' म्हणतात. याचा अर्थ काय आहे? तुझ्या सर्व मन्नत इथे पूर्ण झाल्या तरीही तू नवीन मन्नत मागत आहेस. तो त्याचं बंगल्यामध्ये आणखी दोन मजले वर वाढवत आहे, असं मी ऐकलं आहे. त्यामुळे एकूणच त्याच्या इच्छा आणि मागणी वाढत आहेत. पण जर तुमचं जन्नत दुबईत असेल, तर तुम्ही भारतात काय करत आहात?"
अभिनव कश्यप यांनी शाहरुख खानच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आणि ते म्हणाले, "या लोकांना आपण काय म्हणायचे? या लोकांनी सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर स्वतःचे महाल उभे केले आहेत. त्यांची नेटवर्थ किती आहे, याच्याशी मला काय देणंघेणं आहे? तुम्ही मला खायला देता का? शाहरुख खान बोलण्यात हुशार असेल, पण त्याचा हेतू चुकीचा आहे, असं मला वाटतं. त्यामुळेच तो सिनेमांमध्ये ‘बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर’ असे डायलॉग्स मारतो.''
सलमान खानवरही साधला होता निशाणा
शाहरुख खानवर टीका करण्यापूर्वी अभिनव कश्यपने सलमान खान आणि त्याच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले होते. अभिनव म्हणाले होते, "माझ्या मते सलमान खान आणि त्याचं कुटुंब सामान्य नागरीक नाहीत. ते गुन्हेगार आहेत. सलमान सध्या जामिनावर बाहेर आहे. गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो." अभिनव यांनी सलमान खानला गुंड आणि बदला घेणारा माणूस, असंही म्हटलं होतं. अभिनव कश्यप यांनी बॉलिवूडमधील या दोन मोठ्या सुपरस्टारवर केलेल्या सलग आणि कठोर टीकेमुळे मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.