पहलगाम हल्ल्यानंतर शाहरुख खानचा Video चर्चेत, दहशतवाद आणि इस्लाम धर्माबाबत म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 17:30 IST2025-04-25T17:28:51+5:302025-04-25T17:30:08+5:30
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर शाहरुख खानचा Video चर्चेत, दहशतवाद आणि इस्लाम धर्माबाबत म्हणाला...
Pahalgam Terror Attack: काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी भ्याड हल्ला झाला. काही दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. यात जवळपास २६ पर्यटकांपेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावला. देशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळी घडलेल्या या भयानक घटनेनंतर अभिनेता शाहरुख खानने दु:ख व्यक्त केलं. अशातच आता शाहरुखचा एक जुना व्हिडीओ चर्चेत आला आहे. ज्यामध्ये त्यानं दहशतवाद आणि इस्लाम धर्माबाबत मोठ विधान केल्याचं पाहायला मिळतंय.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख खानचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्याने दोन प्रकारच्या इस्लामवर भाष्य केलं. एक म्हणजे दहशतवाद्याचा कट्टरपंथी इस्लाम आणि दुसरा इस्लाम ज्याचा पवित्र ग्रंथ कुराणात उल्लेख करण्यात आलाय. इस्लाम धर्माची संकल्पना परिभाषित करताना शाहरुख म्हणाला, "मी खोटे बोलणार नाही. २-३ वर्षांपूर्वी जर कोणी मला सांगितलं असतं की दहशतवाद हा इस्लामी स्वरूपाचा आहे. तर मी तो नाकारला असता. पण आता मला समजलंय की दहशतवादी ज्या इस्लामचे पालन करत आहेत, तो आमचा इस्लाम नाही. तो आमचा धर्मच नाही".
इस्लाम दयाळूपणा शिकवतो हे स्पष्ट करण्यासाठी शाहरुख खानने सूरह अल-माइदाच्या ३२ आणि ३३ व्या ओळींचा उल्लेख केला. शाहरुख म्हणाला, "पवित्र कुराणात अल्लाहने म्हटले आहे की जर कोणी एखाद्या व्यक्तीला बरं केलं तर तो संपूर्ण मानवजातीला बरे करतो आणि जर कोणी एखाद्या व्यक्तीला दुखावलं तर तो संपूर्ण मानवजातीला दुखावतो. अल्लाहने मुस्लिमांना इस्लामच्या फायद्यासाठी लढलेल्या युद्धातही शत्रूंच्या महिला, मुले, प्राणी आणि पिकांना इजा करू नये असे निर्देश दिलेत. मला हे सांगताना वाईट वाटतंय आणि मला कोणाच्याही विरोधात जायचे नाही, पण, हे दहशतवादी ज्या दुसऱ्या इस्लामचं पालन करत आहेत, ती मुल्लांची भाषा आहे".
When India’s icon #ShahRukhKhan talked about Islam, Quran and Terrorism in an interview with @sardesairajdeep. Must watch and do share for others.
— Aavishkar (@aavishhkar) May 8, 2023
pic.twitter.com/2KJ6inpfew
शाहरुख खान हा सर्वात धर्मनिरपेक्ष अभिनेता मानला जातो. त्याचे कुटुंब याचा पुरावा आहे. तो प्रत्येक धर्माचा आदर करतो. किंग खानची पत्नी गौरी ही हिंदू आहे आणि तिने लग्नानंतर धर्म बदलेला नसून ती आजही हिंदू धर्माचे पालन करते. तसेच शाहरुख आणि गौरीची मुले आर्यन, सुहाना आणि अबराम हेदेखील सर्व सणांचा आदर करतो. शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'किंग' चित्रपटात दिसणार आहे. २०२३ मध्ये शाहरुखचे 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' हे चित्रपट प्रदर्शित झाले होते.