"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 14:29 IST2025-11-03T14:29:02+5:302025-11-03T14:29:34+5:30
अभिनेता म्हणून तुम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण...

"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने काल ६० वा वाढदिवस साजरा केला. जगभरातील चाहत्यांनी शाहरुखला शुभेच्छा दिल्या. अनेक चाहते रात्रीपासूनच 'मन्नत'बाहेर पोहोचले होते. तर शाहरुखने आपल्या मित्रपरिवारासोबत अलिबाग येथे वाढदिवस साजरा केला. सुरक्षेच्या कारणाने शाहरुखला 'मन्नत'बाहेरील चाहत्यांना भेटला आलं नाही. शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत काही चाहत्यांसोबत meet and greet इव्हेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी शाहरुखने सर्वांसोबत दिलखुलास संवाद साधला. तेव्हा त्याने राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाला यावरही भाष्य केलं.
शाहरुख खान म्हणाला, " इंडस्ट्रीत ३५ वर्ष झाली आहेत. मला अवॉर्ड्स खूप आवडतात. मला आनंद होतो. मी हेही सांगितलं आहे की पुरस्कार हा एका सिनेमासाठी नसतो तर आपण वर्षभर केलेल्या कामासाठी असतो. अभिनेता म्हणून तुम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केलेला असतो. १०-१५ वर्षांपूर्वी अवॉर्ड मिळालं नाही म्हणून मला वाईटही वाटायचं. कारण मी नेहमी चांगलंच काम करतो असं मला वाटतं(हसतच). मी खूप मेहनत घेतो. स्वत:चं काम पाहून माणूस जरा जास्तच खूश होतो असंही होतं. माझं काम पाहून जेव्हा कौतुक होत नाही तेव्हा मला कधी कधी वाईट वाटतं. खरं सांगायचं तर मला अनेकदा 'व्हॅलिडेशन' हवं असतं. कारण सिनेमात काम केल्यावर त्याची दाद लगेच मिळत नाही. जेव्हा थिएटर करायचो तेव्हा लोक प्रत्यक्षात टाळ्या वाजवायचे. दाद मिळायची. मग १०-१५ वर्षांपूर्वी मी ठरवलं की मला अवॉर्ड मिळो ना मिळो, मी जर माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना भेटू शकलो तर तेच माझ्यासाठी मोठं समाधान असेल."
Shahrukh Khan Sir sharing his feelings for the first time how he felt about Receiving the National award.
— Harry Ghai (@iamharryghai) November 2, 2025
He ends it with , that the love of fans is the greatest award for him. #SRKDay#HappyBirthdaySRKpic.twitter.com/x054lLZruE
तो पुढे म्हणाला, "मला माहितीये हे प्रत्येकवेळी शक्य नाही. आधी मी मॉल, रस्ते, ट्रक, विमान,शो अशा अनेक ठिकाणी लोकांना भेटायचो. आता मी कमी केलं आहे. कारण आता मला इतकं फिरता येत नाही मी सिनेमावर जास्त लक्ष देतो. पण माझ्यासाठी हा क्षण खूप खास आहे. सगळे अवॉर्ड एकीकडे आणि तुमचं हे प्रेम दुसरीकडे. पण यावेळी मला नॅशनल अवॉर्ड मिळाला त्यासाठी खूप आभार. ज्यांनी कोणी मला पाठिंबा दिला त्यांचे आभार. त्यात माझा मित्र आशुतोषही होता. त्याच्या सिनेमासाठी मला अवॉर्ड मिळावा असं त्यालाही तेव्हा वाटलं होतं. तो कमिटीचा मुख्य होता. मला अवॉर्ड मिळाला. मी जेव्हा ज्युरींना भेटलो सगळेच खूप खूश होते. आता आर्टिस्टिक फिल्म आहे की कमर्शियल फिल्म आहे हा फरक संपला याचा मला आनंद आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते मला अवॉर्ड मिळाला हे माझं भाग्यच आहे. माझ्यासाठी ही गर्वाची बाब आहे. आता मला फिल्मफेअर अवॉर्ड्स इतके नॅशनल अवॉर्ड्स मिळो अशी माझी इच्छा आहे."